रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयासह राजापूर येथील दिवाणी व कनिष्ठ स्तर न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने सोमवारी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या धमकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही न्यायालयांमध्ये पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. श्वानपथक, बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांनी न्यायालयांच्या इमारतींची कसून तपासणी केली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे नागरिकांसह न्यायालयीन यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला.
रत्नागिरी जिल्हा न्यायालयात सोमवारी दुपारी बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. या ई-मेलमध्ये राजापूर न्यायालयातही बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा न्यायालयाकडून राजापूर न्यायालयाला सतर्क करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा न्यायालयात दुपारी दोन वाजल्यापासून शोधमोहीम सुरू करण्यात आली. श्वानपथक, बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांच्या मदतीने सुमारे चार तास न्यायालयाची इमारत आणि परिसराची तपासणी करण्यात आली. न्यायालयातील विविध खोल्या आणि परिसराची तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर रत्नागिरीतील शोधमोहीम थांबवण्यात आली.
याबाबत माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी न्यायालयातील तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, राजापूर न्यायालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल आल्याने तेथेही तपासणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, राजापूर न्यायालयाला धमकीचा ई-मेल आल्याचे समजताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. राजापूर न्यायालयाच्या न्यायाधीश स्वरांजली हाके यांनी पोलीस निरीक्षक अमित यादव यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक यादव हे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने न्यायालयात दाखल झाले.
सुरक्षेच्या दृष्टीने न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, वकील आणि पक्षकारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. न्यायालयाची संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालय परिसरातील दुकाने बंद करण्यात आली, तर न्यायालयासमोरील वाहतूकही थांबवण्यात आली. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यासोबतच राजापूर नगर परिषदेचे दोन अग्निशमन बंबही तैनात करण्यात आले.
यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने न्यायालयाच्या इमारतीतील सर्व मजले आणि खोल्यांची तपासणी केली. संशयास्पद वस्तूंचीही पाहणी करण्यात आली. मात्र, या शोधमोहिमेत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. त्यामुळे राजापूर न्यायालयातील कामकाज सायंकाळी चार वाजता पुन्हा सुरू करण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.
या तपासणीदरम्यान नाटे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हेही आपल्या सहकाऱ्यांसह राजापुरात दाखल झाले होते. उपविभागीय अधिकारी सुरेश कदम यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी उशिरा बॉम्ब शोधक पथकानेही राजापूर न्यायालयाची तपासणी केली. त्यातही काहीही संशयास्पद आढळले नाही.
रत्नागिरी आणि राजापूर या दोन्ही न्यायालयांना बॉम्बची धमकी मिळाल्याची माहिती पसरताच नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. राजापूर न्यायालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक बंद असल्याचे पाहून अनेकांनी नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी पोलीस आणि पत्रकारांशी संपर्क साधला. मात्र, दोन्ही ठिकाणी तपासणीत काहीही आढळून न आल्याने धमकीच्या ई-मेलमुळे निर्माण झालेली भीती दूर झाली.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.













