श्री समर्थ भंडारी पतसंस्थेचे दुसरे रक्तदान शिबीर उत्साहात; ५२ रक्तदात्यांचा सहभाग
चिपळूण (प्रतिनिधी) : रक्तदानासारखे जीवनदायी उपक्रम राबविणे ही समाजाप्रती असलेली महत्त्वाची बांधिलकी आहे. श्री समर्थ भंडारी पतसंस्थेने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेले रक्तदान शिबीर आणि अन्य सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधतानाच सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचे काम संस्था करीत आहे, असे गौरवोद्गार गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी काढले. श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिपळूण या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गुहागर तालुक्यातील चिखली येथील आयुष्यमान आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या शिबिरात संस्थेचे सभासद, कर्मचारी आणि सेवाभावी नागरिक अशा एकूण ५२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. शिबिराचा शुभारंभ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आला. त्यानंतर सभापती प्रणव पोळेकर, आरोग्य अधिकारी डॉ. जांगीड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथील डॉ. स्नेहल धुमाळ, अधिपरिचारिका जयश्री कुंडलकर तसेच संस्थेच्या संचालिका स्मिता आरेकर आणि पराग आरेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सभापती प्रणव पोळेकर यांनी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यात जलसंवर्धनासारखे उपक्रम राबविताना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अधिपरिचारिका जयश्री कुंडलकर यांनी सध्याच्या काळात रक्ताची असलेली गरज आणि रक्तदानाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. मनोरंजनात्मक कार्यक्रमांऐवजी समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रक्तदानासारख्या उपक्रमाला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे विशेष कौतुक केले.
संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. यापूर्वी चिपळूण येथे पहिले रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यापुढे प्रत्येक तालुक्यातील संस्थेच्या शाखांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे त्यांनी विशेष आभार मानले. रक्तदान शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय पथकाचे तसेच आयुष्यमान आरोग्य केंद्र, चिखली येथील डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाचे त्यांनी आभार मानले. शिबिरासाठी आरोग्यविषयक आवश्यक सोयीसुविधांसह सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. जांगीड, डॉ. इंगळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.
या रक्तदान शिबिराला पंचायत समिती सदस्या उर्वी खैर, चिखली ग्रामपंचायतीचे उपसरपंच दळवी, चिखली विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद आरेकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश शिर्के, भगवान कदम, दत्ताराम कानसे, चंद्रकांत चांदोरकर, अशोक साळवी यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. रक्तदात्यांसह संस्थेचे अनेक सभासद आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संस्थेचे व्यवस्थापक संदीप रहाटे यांनी मानले. रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्री समर्थ भंडारी पतसंस्थेने रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमाला दिलेले प्राधान्य संस्थेच्या सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवणारे ठरले. सहकार क्षेत्रातील आर्थिक वाटचालीसोबतच समाजहिताचे उपक्रम राबविण्याचा संस्थेचा संकल्प या उपक्रमातून अधोरेखित झाला.













