फटाक्यांचा त्याग करूया, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करूया! – धनाजी वाघमोडे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथे मंगळवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याच्या उद्देशाने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संजना तारी होत्या. कार्यक्रमात इको क्लबचे शिक्षक धनाजी वाघमोडे यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी धनाजी वाघमोडे यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण असून तो पर्यावरणाला हानी न पोहोचवता साजरा करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडल्यामुळे ध्वनी आणि हवा प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे फटाक्यांचा वापर टाळून पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या धुराचा आणि विषारी वायूंचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलांना हवा प्रदूषणाचा अधिक त्रास सहन करावा लागतो. तसेच मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण निर्माण होऊन लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच पशुपक्ष्यांनाही त्रास होतो, याची माहिती त्यांनी दिली.
दरवर्षी फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना घडून जीवित व वित्तहानी होते. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे आवश्यक आहे. दिव्यांची आरास, आकाशकंदील, रांगोळ्या, फुलांची सजावट आणि पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करून आनंद द्विगुणित करावा. हवा व ध्वनी प्रदूषण होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मुख्याध्यापिका सौ. संजना तारी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःपासून सुरुवात करावी आणि आपल्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनाही याबाबत जागरूक करावे, असे सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक व फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची सामूहिक शपथ दिली.
प्रकाशाचा सण असलेली दिवाळी पर्यावरणाला हानी न पोहोचवता साजरी करण्याचा आणि स्वच्छ, सुंदर व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.