वाघाची आणि बिबट्याची नखे व सुळे विकणाऱ्या आंतरराज्यीय वन्यजीव तस्करांच्या रॅकेटचा पर्दाफाश

कुडाळ आणि वेंगुर्ले येथे मोठी कारवाई करत तीन जणांना अटक

सावंतवाडी :
​ वनविभाग सावंतवाडी अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका यशस्वी कारवाईत वन्यप्राण्यांच्या अवयवांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यात रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४८ वर्षेरा. कामतवाडी वायंगणी ता. वेंगुर्ला ) व्यवसाय राज्य परिवहन महामंडळ वेंगुर्ला बस स्थानक शिपाई, विजय रविकांत शिंदे ( वय 31 वर्षे रा. मुळदे ता. कुडाळ ) तर संशयित आरोपी क्रमांक ३ – मुनाफ इस्माईल मुकादम, (वय ४० वर्षेरा. अनपूर विजयदुर्ग ता. देवगड )यांना ताब्यात घेण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या सावंतवाडी बस स्थानकात शिपाई म्हणून कर्तव्यावर असलेला मुख्य संशयित आरोपी रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४८) याने पैशांच्या लोभापोटी वन्यप्राण्यांचे अवशेष विकण्याचे ठरवले होते. या कारवाईत वनधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला, ज्यामध्ये आरोपीने आधी वेंगुर्ले बस स्थानकावर बोलावून १२ वाघनखांच्या विक्रीसाठी अडीच लाख रुपयांचा व्यवहार ठरवला. त्यानंतर कुडाळ बस डेपो येथील काळप नाका येथे रोहिदास कामत याने आपल्या साथीदारांच्या माध्यमातून वाघनखे दाखवण्यासाठी पाठवले असता, वनविभागाच्या पथकाने तिन्ही आरोपींना बस डेपोच्या प्रवेशद्वारावरच झडप घालून रंगेहात ताब्यात घेतले.

यावेळी संशयित ​आरोपींच्या अंगझडतीदरम्यान वन्यप्राणी वाघाचा १ दातसुळा (लांबी ५ सेंमी), बिबट्याची २ नखे (लांबी ४ सेंमी) आणि सोन्यामध्ये मढवलेले वन्यप्राण्याचे २ सुळेदात (लांबी २ सेंमी) असा एकूण बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा सर्व मुद्देमाल वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील अनुसूची १ अन्वये संरक्षण प्राप्त वन्यप्राण्यांची शिकार करून मृगयाचिन्हे तयार करत विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी वनपाल नेरुर तर्फ हवेली यांनी गुन्हा नोंद केला असून, तिन्ही आरोपींना अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कुडाळ यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी क्रमांक १ व २ यांना दोन दिवसांची वन कोठडी तर आरोपी क्रमांक ३ याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

​सदरची ही धडक कारवाई उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, डाॅ. सुनील लाड यांच्या नेतृत्वाखाली कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वनपाल संजय हजारे, सूर्यकांत सावंत, पोलीस हवालदार गौरेश राणे आणि वनरक्षक अतुल खोत, ब्रम्हकुमार भोजने, अनिकेत माने, समीर खरवत, प्रवीण कमळकर तसेच चालक राहुल मयेकर यांच्या पथकाने अत्यंत यशस्वीपणे पार पाडली.

गोवा व कर्नाटक राज्यांच्या सीमेवर असलेला सिंधुदुर्ग जिल्हा पश्चिमघाटाच्या कुशीत जैवविविधतेने नटलेला आणि व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा प्रमुख कॉरिडोअर असल्याने वन्यप्राण्यांच्या शिकारीविरोधात सावंतवाडी वनविभागाने विशेष मोहीम तीव्र केली असून, अशा प्रकारच्या तस्करीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पुढे यावे आणि माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रभारी उपवनसंरक्षक किरण जगताप यांनी केले आहे.