सातार्डा चेक पोस्टवर ६०० बॉक्स अवैध दारूसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी पोलिसांकडून मोठी कारवाई 

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा चेक पोस्टवर पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करत, दारूने भरलेले तब्बल ६०० बॉक्स आणि सुमारे ६० ते ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

​सातार्डा चेक पोस्ट येथे अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईत अवैध दारूचे तब्बल ६०० बॉक्स सापडले असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ५० लाखांची दारू व टेम्पो मिळून ६० ते ७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर घटनास्थळावरून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुढील कारवाईसाठी सावंतवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

​पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार श्रीरंग टाकेकर, राहुल बर्गे, पोलीस हर्षद हिंगे, धोत्रे आणि निलेश नाईक यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईदरम्यान पंच म्हणून शंकर साटेलकर आणि प्रकाश मेस्त्री उपस्थित होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.