वांझोळे बुद्रुकमध्ये भरदिवसा थरार; ६७ वर्षीय महिलेच्या डोळ्यांदेखत चोरट्याचा डाव यशस्वी, दुचाकीवरून फिल्मी स्टाईलने पलायन
पोलीसांना थेट चॅलेंज देत लाखाचा मुद्देमाल लांबवणारा भामटा कधी जेरबंद होणार? संपूर्ण तालुक्याचे लक्ष
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या वांझोळे बुद्रुक गवळीवाडी येथे एखाद्या थरारक सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात शोभेल असा प्रकार घडला असून, एका भामट्याने अत्यंत चलाखीने आणि फिल्मी स्टाईलने ६७ वर्षीय वृद्ध महिलेला दिवसाढवळ्या लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मदतीचे सोंग दाखवून, गोड बोलून आणि विश्वास संपादन करून शेतात काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास करंबेळे धावडेवाडी मार्गालगत हा थरार घडला. सौ. सरीता पांडुरंग वाजे (वय ६७, रा. वांझोळे बुद्रुक, गवळीवाडी) या आपल्या म्हशी चरवत असताना शेतातील चारा काढण्याच्या अत्यंत प्रामाणिक कामात व्यस्त होत्या. सकाळची वेळ आणि आजूबाजूला फारशी वर्दळ नसलेली निर्मनुष्य परिस्थिती असल्याचा नेमका फायदा घेत एक अनोळखी इसम त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचला. अत्यंत धूर्तपणे त्याने महिलेकडे विळा मागितला आणि भेंडीचे दोर काढायचे असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. वृद्ध महिलेनेही विश्वासापोटी त्याला विळा हातात दिला. त्यानंतर तो इसम भेंड काढण्याचे काम करू लागला. त्याच्या मनात वेगळाच कट शिजत असल्याची पुसटशी कल्पनाही त्या वृद्ध महिलेला आली नाही. मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्या चतुर चोराने आपल्या मनात शिजलेला डावाचा अंतिम अंक अगदी चोखपणे बजावला. जशी योग्य संधी मिळाली, तसा त्याने थेट महिलेच्या गळ्यातील सोन्यावर झडप घातली, तब्बल एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि काही अंतरावर उभी केलेल्या दुचाकीवर स्वार होऊन वारा वेगाने धूम ठोकली.
काही कळण्याच्या आतच चोरटा घटनास्थळावरून गायब झाल्यामुळे हतबल झालेल्या त्या आजीबाईंना मोठा मानसिक धक्का बसला. एका भरवश्याच्या माणसाने केलेला हा विश्वासघात आणि अत्यंत चलाखीने साधलेला डाव पाहून परिसरातील नागरिकही अवाक झाले आहेत. याप्रकरणी मिळालेल्या फिर्यादीवरून देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास देवरुख पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम ए. पंदेरे करत आहेत. शेतात राबणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेला अशा प्रकारे लुटल्याने संगमेश्वर परिसरातील ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. अनोळखी व्यक्ती अशा प्रकारे फसवणूक करू शकते, याची जाणीव या घटनेने करून दिली आहे. दिवसाढवळ्या अशा पद्धतीने गुन्हे करून दुचाकीवरून पसार होणाऱ्या या सराईत चोराचा पोलीस यंत्रणा कधी छडा लावणार आणि लाखाच्या मंगळसूत्रावर डल्ला मारणारा हा भामटा खाकीच्या जाळ्यात कधी जेरबंद होणार, याकडे आता संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे डोळे लागले असून पोलीस प्रशासनासमोर या चोराला हुडकून काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.












