आपले सरकार पोर्टलच्या सेवेत रत्नागिरी पोलीस दल पुन्हा राज्यात अव्वल

ऑक्टोबरमध्ये सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक; १,९८० पैकी १,८७३ अर्जांचा वेळेत निपटारा

रत्नागिरी : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत ‘आपले सरकार पोर्टल’द्वारे नागरिकांना ऑनलाइन सेवा पुरविण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ऑक्टोबर २०२६ मध्ये पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. एकूण कामगिरी आणि नागरिकांच्या समाधानाच्या गुणांकनात जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
महाराष्ट्र शासनाकडून विविध विभागांच्या ऑनलाइन सेवांचे नियमित मूल्यमापन केले जाते. त्यामध्ये रत्नागिरी पोलीस दलाने मिशन रॅपिडअंतर्गत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी केली.ऑक्टोबर महिन्यात ‘ओव्हरऑल टॉप परफॉर्मिंग सर्व्हिस’ आणि ‘सर्व्हिस विथ हायेस्ट सिटिझन स्कोअर’ या दोन्ही प्रकारांत रत्नागिरी पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
जिल्हा पोलीस दलाकडे विविध शासकीय सेवांसाठी एकूण १ हजार ९८० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ हजार ८७३ अर्जांचा विहित वेळेत निपटारा करण्यात आला. वेळेत सेवा देण्याच्या निकषावर ९.२८ गुणांकन मिळवत पोलीस दलाने आघाडी कायम ठेवली.नागरिकांना जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन रॅपिडच्या माध्यमातून ही कामगिरी साध्य झाली आहे. भविष्यातही नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.