राज्य प्राथमिक शिक्षक समिती लांजा शाखेचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

सलग तीस वर्षे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करणारी जिल्ह्यातील एकमेव संघटना

लांजा (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका शाखा लांजा यांच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळा रविवारी उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, स्थायी समिती सदस्य संतोष रेवाळे, शिक्षण समिती सदस्य मनीषा लाखन, जिल्हा परिषद सदस्य लीला घडशी, पंचायत समिती सदस्य साक्षी चव्हाण, राज्य सल्लागार विलास जाधव, संगमेश्वर तालुकाध्यक्ष संदेश गावडे, मुकुंद वाजे, संचालक श्री. गोताड , खांडेकर , जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक, कार्याध्यक्ष सिताराम कोसंबे, कोषाध्यक्ष राजेश शिर्के, जिल्हा सरचिटणीस संतोष पावणे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष मनीष देसाई, गुहागर तालुकाध्यक्ष नरेंद्र देवळेकर आणि विभागीय अध्यक्ष संदीप मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका शाखेचे अध्यक्ष दिलीप दिवाळे यांनी केले. शिक्षक समितीच्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली, संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा, गुणगौरव सोहळा तसेच सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण, बंधारे बांधणे यांसारखे विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने पत्रव्यवहार करून त्यांच्या समस्या मार्गी लावण्यावर संघटना भर देते.
या सोहळ्यात नवोदय परीक्षेस पात्र ठरलेले विद्यार्थी तसेच इयत्ता चौथी, पाचवी, सातवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. तसेच नूतन केंद्र समन्वयक, नूतन शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांना गौरवून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक यांनी शिक्षक समितीच्या कार्याचे कौतुक केले. विशेषतः लांजा तालुका शाखेच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी शिक्षक समितीचे कार्य हे शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी असल्याचे स्पष्ट केले. “न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड” हे ब्रीदवाक्य घेऊन संघटना काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रियांका नान्नीकर, दिनेश झोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित मान्यवर, गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक, देणगीदार आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका शाखा लांजा यांच्या वतीने सरचिटणीस दिनेश झोरे यांनी आभार मानले.