लांजा हायस्कूलची विद्यार्थीनी सान्वी चव्हाण करणार उंच उडी क्रीडा प्रकारात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

लांजा (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल लांजाची विद्यार्थिनी कु. सान्वी सुहास चव्हाण हीची उंच उडी या मैदानी क्रीडा प्रकारात रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाली असून, हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत ती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मैदानी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत लांजा हायस्कूलची विद्यार्थिनी असलेल्या सान्वीने उंच उडी प्रकारात चमकदार कामगिरी केली. तिच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात तिची निवड करण्यात आली. हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत ती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
सान्वीच्या या यशाबद्दल न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजाचे अध्यक्ष, संस्थेचे सर्व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी तिचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान तिच्या या यशाबद्दल
अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.