वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा राज्यस्तरावर गौरव!
चिपळूण (वार्ताहर) : कोकणात आरोग्यसेवेचा वसा जपणारे नामवंत त्वचा विकार तज्ज्ञ डॉ. यतीन जाधव आणि ‘स्प्रिंग स्किन क्लिनिक’च्या संचालिका डॉ. वैशाली जाधव यांना त्यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रतिष्ठेच्या ‘एबीपी माझा आरोग्यरत्न सन्मान पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील हॉटेल आयटीसी ग्रँड मराठा येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
चिपळूणसारख्या शहरातून सुरू झालेल्या या वैद्यकीय प्रवासाची राज्यस्तरावर दखल घेतल्या गेल्याने संपूर्ण कोकण परिसरातून या डॉक्टर दाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेल्या सुमारे तीस वर्षांपासून चिपळूणसारख्या छोट्या शहरातून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. यतीन जाधव यांनी त्वचा विकार चिकित्सा, सौंदर्यचिकित्सा, ॲलर्जी चिकित्सा आणि औद्योगिक स्वास्थ्य या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाची लेसर उपकरणे आणि अद्ययावत उपचारपद्धतींच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले स्प्रिंग स्किन अँड कॉस्मेटोलॉजी लेसर क्लिनिक हे कोकणातील एक प्रगत उपचार केंद्र म्हणून ओळख निर्माण करत आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सांगली तसेच बेळगाव परिसरातूनही रुग्ण येथे उपचारांसाठी येत आहेत. केवळ आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता रुग्णांना योग्य उपचार, मानसिक समाधान आणि आत्मविश्वास मिळवून देण्यावर या संस्थेचा भर आहे. त्वचारोग आणि सौंदर्यचिकित्सा ही केवळ बाह्यरूपाशी संबंधित नसून व्यक्तीच्या आत्मविश्वासाशी आणि मानसिक समाधानाशी जोडलेली असल्याचे डॉ. जाधव यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
या यशस्वी प्रवासात डॉ. वैशाली जाधव यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. वैद्यकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी प्रत्येक उपक्रमात खंबीर साथ दिली असून, हा दोघांचाही एकत्रित स्वप्नांचा प्रवास असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्प्रिंग क्लिनिकबरोबरच अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एजीस हेल्थकेअर, इंडस्ट्री हेल्थ या औद्योगिक स्वास्थ्य क्षेत्रातील उपक्रम आणि चिपळूणमधील माधवबाग शाखेच्या माध्यमातूनही अनेक रुग्णांना आरोग्यसेवा देण्याची संधी मिळाली आहे. या संस्थांच्या उभारणीमध्ये अनेक डॉक्टर, कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रवासात डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. माधव सोमण, डॉ. अश्विनी, तृप्ती भागवत, सारा निवशेकर, प्रियांका कदम, प्रतिभा, पूनम, सुप्रिया, सोनाली, दीप्ती, जयेश, दत्ताजी, ऋषिकेत, मेहंदी, सानवी ओगले, विजय कदम, पूजा, सचिन नाणिजकर, कांचन साळवी, वर्षा, मुग्धा, समृद्धी गायकर , हर्षदा, शैलेश मोरे, अविनाश पाणकर, अशोक जाधव, राजेश पवार, कुंदा, श्रेया, अकसा, नीती, संदेश, मिलिंद, पूर्वा करोडे, पायल, स्मिता मैंदरकर आणि शुभांगी शिंदे यांच्यासह स्प्रिंग क्लिनिकशी जोडलेल्या प्रत्येक सहकाऱ्याचे योगदान मोलाचे असल्याचे डॉ. जाधव यांनी विशेषत्वाने नमूद केले. संस्था एखाद्या व्यक्तीच्या संकल्पनेतून जन्माला येते; मात्र ती मोठी होते ती अनेकांच्या समर्पणातून, या शब्दांत त्यांनी आपल्या संपूर्ण टीमप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही जाधव दाम्पत्य सक्रिय आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर,सांज सोबत,आपलं चिपळूण, एकता विकास मंच, श्रीराम एज्युकेशन सोसायटी, स्नेहस्पर्श फाउंडेशन, फुलवा, विभा अरविंद ग्रंथालय, टच यांसारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. डॉक्टर म्हणून रुग्णांचे आजार बरे करण्याबरोबरच समाजाचा एक घटक म्हणून सामाजिक प्रश्नांवरही काम करण्याची जबाबदारी असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. यतीन जाधव यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनी आणि पुरस्कार निवड समितीचे आभार मानले.
या पुरस्कारामागे केवळ व्यक्तीचे कर्तृत्व नसून त्यासाठी योगदान देणाऱ्या असंख्य व्यक्तींचे श्रम, विश्वास आणि समर्पण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आई-वडिलांचे संस्कार, पत्नी डॉ. वैशाली जाधव यांची साथ, सहकारी डॉक्टर, कर्मचारी, मित्रपरिवार आणि सामाजिक संस्थांमधील सहकाऱ्यांचे योगदान त्यांनी कृतज्ञतापूर्वक अधोरेखित केले. रुग्णांनी दाखवलेला विश्वास हीच आपल्या संस्थांची खरी संपत्ती असल्याचेही त्यांनी नमूद केले. चिपळूणमधून सुरू झालेल्या वैद्यकीय सेवेच्या प्रवासाची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याने डॉ. यतीन जाधव व डॉ. वैशाली जाधव यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे चिपळूणसह संपूर्ण कोकणच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.













