लांजा तहसीलदारांना निवेदन, योग्य ती कार्यवाही करण्याची केली मागणी
लांजा (प्रतिनिधी): वेरळ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना धमकावणे, शिवीगाळ करणे या प्रकरणाचा तालुक्यातील शिक्षक संघटनांनी जाहीर निषेध केला असून शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन लांजा तहसीलदार यांना आज सादर करण्यात आले.
लांजा तहसीलदार यांना आज गुरुवारी सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुणाल कुर्णेकर या व्यक्तीने दारूच्या नशेत वेरळ जिल्हा परिषद मराठी शाळेत येऊन शिक्षकांना शिवीगाळ करणे ,धमकावणे अशा प्रकारचे कृत्य केले होते. त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. निश्चितच ही निंदनीय बाब असून अशा प्रकारांमुळे शिक्षकांमध्ये असुरक्षिततेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर देखील या घटनांचे वाईट परिणाम होऊ शकतात.
त्यामुळे सदर गंभीर बाब लक्षात घेऊन असे गैरप्रकार केल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तहसीलदार यांच्याबरोबरच, पोलीस उपनिरीक्षक लांजा, सभापती पंचायत समिती लांजा, गट विकास अधिकारी लांजा व गटशिक्षणाधिकारी लांजा यांना निवेदन देऊन झालेल्या घटनेबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस संतोष पावणे केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हा सरचिटणीस श्री उमेश केसरकर, शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस श्री नंदकुमार भागवत, शिक्षक नेते बाबा माने, पदवीधर संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय डांगे शिक्षक संघाचे प्रभाकर तांबे, पदवीधर संघटनेचे तालुकाध्यक्ष उदय घाडी, पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष नितीन कोलते अखिल महाराष्ट्र संघाचे प्रशांत गोसावी शिक्षक समितीचे सरचिटणीस दिनेश झोरे, केंद्रप्रमुख संघटनेचे रवींद्र जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते












