तेर्सेबांबर्डे येथे विद्यार्थ्यांसमवेत वसुबारस सण उत्साहात साजरा

गाय-वासराचे पूजन करून विद्यार्थ्यांना चारा, पुरणपोळी व फलाहाराचे वाटप

स्वप्निल कदम l कुडाळ :       तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद केंद्र शाळा क्रमांक १ यांच्या संयुक्त विद्यमाने आज वसुबारस सण मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत गाय व वासराचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी गायीला चारा अर्पण करून पुरणपोळी व फलाहार देण्यात आला.

 

या उपक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भारतीय संस्कृतीत गायीला असलेले धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच आपल्या परंपरा आणि संस्कृतीची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

 

यावेळी सरपंच रामचंद्र परब, उपसरपंच माधवी कानडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष डीचोलकर, अजय डीचोलकर, गुणाजी जाधव, ग्रामविकास अधिकारी भूषण बालम, गोपालक सुभाष बाणे, ग्रामपंचायत कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक राणे, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांच्या सहभागातून साजऱ्या झालेल्या या उपक्रमामुळे वसुबारस सणाचे महत्त्व अधोरेखित झाले. पारंपरिक सण-उत्सवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, प्राणीप्रेम आणि निसर्गाप्रती आदरभाव रुजविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.