शहरात नागरिक, पर्यटक यांना सुविधांसाठी महायुतीचे लोकप्रतिनिधी कटिबद्ध; स्थायी समितीच्या निर्देशानंतर दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात
नगरपरिषदेच्या कामाचे श्रेय लाटण्याचा उबाठा गटाचा केविलवाणा प्रयत्न
दहा वर्षांच्या सत्ताकाळात काय केले? : स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांचा परखड सवाल.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील नागरिकांसह पर्यटकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महायुतीचे लोकप्रतिनिधी कटिबद्ध असून, बंदर जेटीवरील सार्वजनिक प्रसाधनगृहातील असुविधा दूर करण्यासाठी मालवण नगरपरिषदेने तत्परतेने कार्यवाही सुरू केली आहे. महिनाभरापूर्वी पासून याबाबत कार्यवाही सुरु होती. नगरपरिषद स्थायी समितीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार प्रसाधनगृहाच्या दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामाचे श्रेय लाटण्यासाठी उबाठा गटाकडून केवळ राजकीय स्टंटबाजी सुरू असल्याचा आरोप स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी केला आहे. दहा वर्षे सत्तेत असताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी काहीच केले नाही. त्यावेळी नेमके केले तरी काय ? असा परखड सवाल उपस्थित करत, स्वतःच्या सत्ताकाळातील निष्क्रियता झाकण्यासाठी आणि आता महायुतीच्या विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी उबाठा गटाची केविलवाणी धडपड सुरू असल्याचा घणाघात मालवण नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी उबाठा गटावर केला.
मालवण बंदर जेटी परिसरातील सार्वजनिक शौचालयात विविध असुविधा असल्याबाबत स्थानिक व्यावसायिकांनी नगरपरिषदेचे लक्ष वेधले होते. त्याची तातडीने दखल घेत स्वच्छता व आरोग्य सभापती या नात्याने आपण आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. यावेळी स्थानिक व्यावसायिकांच्या उपस्थितीत शौचालयाची पाहणी करण्यात आली. पाण्याच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी अस्वच्छता, काही ठिकाणी तुटलेल्या अवस्थेतील स्लॅब, अपुरी विद्युत व्यवस्था यांसह अन्य समस्या निदर्शनास आल्या. आगामी पर्यटन हंगाम लक्षात घेता नागरिक, स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी या असुविधा तातडीने दूर करण्याची आवश्यकता पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर २२ ऑक्टोबर २०२६ रोजी नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बंदर जेटी येथील सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीचा विषय प्राधान्याने मांडण्यात आला. नगराध्यक्षांनी या समस्यांची गांभीर्याने दखल घेत आरोग्य विभाग आणि बांधकाम विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर लगेचच शौचालयाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता प्रसाधनगृह कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी बोअरवेल उभारणीच्या दृष्टीनेही प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. लवकरच बोअरवेल उभारणी केली जाणार आहे. ही वस्तुस्थिती असताना उबाठा गटाकडून आपणच समस्या मांडल्यामुळे त्या सोडविण्यात आल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
दहा वर्षे सत्ता असताना बंदर जेटीच्या सुविधांकडे दुर्लक्ष का?
मालवण शहरातील बंदर जेटी हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. उबाठा गटाकडे मागील दहा वर्षे सत्ता होती. त्यांचे आमदारही होते. मग त्या काळात या महत्त्वाच्या पर्यटनस्थळावरील सार्वजनिक शौचालयाच्या असुविधा दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधांकडे त्यावेळी दुर्लक्ष का झाले? याचे उत्तर उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला द्यावे, असे आव्हान चव्हाण यांनी दिले.
दहा वर्षे सत्तेत राहून ज्या समस्या सोडविता आल्या नाहीत, त्या समस्या अवघ्या नऊ महिन्यांत सुटल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या उबाठा गटाची भूमिका हास्यास्पद आहे. स्वतःच्या सत्ताकाळातील अपयश झाकण्यासाठी आता नगरपरिषदेच्या प्रत्येक विकासकामात त्रुटी शोधणे, प्रशासनाची बदनामी करणे आणि जनतेची दिशाभूल करणे, हाच विरोधकांचा एककलमी कार्यक्रम बनल्याचा आरोपही त्यांनी केला.
विकासकामांना गती मिळत असल्याने विरोधकांचा जळफळाट!
आमदार निलेश राणे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होत असलेल्या मोठ्या विकासनिधीच्या बळावर मालवण शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत आहे. नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती आणि महायुतीचे नगरसेवक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने कार्यरत आहेत. नगरपरिषद प्रशासनही लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून विकासकामे गतिमान पद्धतीने मार्गी लावत आहे. शहरात विविध विकासकामे सुरू असताना त्याचे स्वागत करण्याऐवजी उबाठा गटाकडून सातत्याने टीका आणि अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण शहरासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध होत असल्याने विरोधकांचा जळफळाट होत आहे. नगरपरिषद प्रत्यक्ष कामातून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत असताना विरोधक मात्र प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत. एआय व्हिडिओ तयार करून शहराची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मालवणच्या पर्यटन व्यवसायालाही बाधा पोहोचविण्याचा प्रकार आहे. जनतेला कोण काम करीत आहे आणि कोण केवळ दिखावा करीत आहे, याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे उबाठा गटाने आपली नौटंकी थांबवावी; अन्यथा जनताच योग्य वेळी त्यांना उत्तर देईल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.
किनारपट्टी भागात अद्ययावत सार्वजनिक शौचालयांची उभारणी करणार!
मालवण हे पर्यटननगरी म्हणून विकसित होत असताना शहरात येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, हे नगरपरिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आमदार निलेश राणे यांच्या सहकार्यातून मालवण बंदर जेटीसह किनारपट्टी भागात अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त सार्वजनिक शौचालये उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पर्यटनस्थळांवरील स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था आणि अन्य नागरी सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात आणि नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपरिषद आणि महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत. आमचे प्राधान्य प्रसिद्धी मिळविणे किंवा श्रेयवाद नसून नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि प्रत्यक्ष विकासकामे पूर्ण करणे हेच आहे. विरोधकांनी कितीही स्टंटबाजी केली तरी मालवण शहराच्या विकासाचा वेग थांबणार नाही, असा विश्वास स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी व्यक्त केला.












