कणकवलीत विधवा महिलेला लिफ्ट देऊन कारमध्येच अत्याचार; संशयित आरोपीला अटक

सुरेश खरात याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी; पोलीस अधिकारी वृषाली बर्गे करताहेत तपास

कणकवली : विधवा महिलेला कारमधून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी सुरेश विठ्ठल खरात (वय ४४, रा. सडेवागोटन, ता. देवगड) याला कणकवली पोलिसांनी मंगळवारी (ता. ३) रात्री उशिरा अटक केली. बुधवारी त्याला कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि संशयित आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. संबंधित महिला नांदगावच्या दिशेने प्रवास करत असताना संशयित आरोपी सुरेश खरात याने तिला आपल्या कारमधून लिफ्ट दिली. त्यानंतर नांदगावच्या अलीकडे काही अंतरावर कार थांबवून त्याने कारमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली.

या तक्रारीची दखल घेत कणकवली पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलीस पथकाने कारवाई करत संशयित आरोपी सुरेश खरात याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी वृषाली बर्गे करत आहेत.