शासनाकडून वेंगुर्ले शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर…

विशेष सभा घेऊन संबंधित कंपनीने नगरसेवकांना प्रकल्पाची सविस्तर माहिती द्यावी..

नगरपरिषद सर्वसाधारण सभेत सर्वानुमते निर्णय

वेंगुर्ले : दाजी नाईक
स्वच्छ आणि सुंदर वेंगुर्ले शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शहरात हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने गोरक्षनाथ ट्रेडर्स अँड कन्स्ट्रक्शन या कंपनीची नेमणूक केली आहे. सुरुवातीला ही कंपनी त्या प्रकल्पाबाबत शहरात सर्वे करणार आहे. मात्र पूर्वी भुयारी गटार योजना करताना आलेले कटू अनुभव लक्षात घेता काम सुरू करण्यापूर्वी एक विशेष सभा घेऊन संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना या प्रकल्पाची सविस्तर माहिती द्यावी असा निर्णय आजच्या न.प. सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात पार पडली. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, न.प. सभापती प्रणव वायंगणकर, सचिन शेट्ये, गौरी मराठे, गौरी माईणकर, युवराज जाधव तसेच नगरसेवक सुषमा प्रभूखानोलकर, रवी शिरसाट, सदानंद गिरप, विनय नेरुरकर, संदेश निकम, दाजी परब, प्रशांत आपटे, आकांक्षा परब, रिया केरकर, सुमन निकम, समिधा रेडकर, काजल कुबल, लीना म्हापणकर, सुधीर पालयेकर, प्रीतम सावंत, शीतल आंगचेकर, कार्यालयीन अधीक्षक अभिजित पाटील यांच्या सह सर्व विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत वेंगुर्ले येथे हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली. दरम्यान वेंगुर्ला शहरात सांडपाण्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. त्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे, पण त्याची सविस्तर माहिती प्रथम कळली पाहिजे अशी भूमिका नगरसेविका सुषमा खानोलकर यांनी मांडली. त्याला अन्य नगरसेवकांनी साथ देत ह्या या कंपनीकडून माहिती दिल्यानंतर डीपीआर तयार करून घेण्यात यावा. कारण योजनेची आर्थिक तरतूद महाराष्ट्र शासनाकडून होणार असली तरी आपण या प्रकल्पाचे काम दर्जेदार पद्धतीने करून घेतले पाहिजे.

माणिकचौक येथील व्यासपीठ दुरुस्तीसाठी आम. प्रमोद जठार यांच्याकडून दहा लाखाचा निधी
विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून माणिकचौक येथील व्यासपीठ दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये निधी देण्याची साठी मंजुरी दिली आहे. त्या कामाचे अंदाजपत्रक बनवून पुढील कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच आमदार प्रमोद जठार यांचे आभार मानण्यात आले.

दरम्यान वेंगुर्ला शहरातील उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी या भागातील पाईपलाईन खराब झाले आहेत, किंवा ज्या भागात नवीन नळ जोडण्या द्यायच्या आहेत त्यांचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करण्यात यावेत. उपलब्ध निधी नुसार ती ती मंजूर कामे मार्गी लावता येईल असे यावेळी ठरविण्यात आले.

वेंगुर्ले नगर परिषदेला कचरा संकलनातून येणारा पाला पाचोळा क्रश करण्यासाठी नवीन मशीन आवश्यक आहे. या मशीनची किंमत साडेतीन ते चार लाख रुपये आहे. त्याचा कचऱ्याचा फायदा खत बनवण्यासाठी होणार आहे. दरम्यान ही मशीन मिळण्यासाठी फोमेंतो कंपनीकडे पत्र व्यवहार करूया असे नगराध्यक्ष यांनी सांगितले.

गवळीवाडा येथील मंदिराच्या कामासाठी निधी मिळावा असे पत्र तेथील नागरिकांनी पालकमंत्री यांच्याकडे द्यावे असे सुचविले आहे, त्यानुसार तसे पत्र देण्याचे ठरले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विमा काढण्याचे ठरले. तसेच कलादालन येथे मोठा बोर्ड लावावा, नगर परिषदेचे मोठे घड्याळ दुरुस्त करून घ्यावे, प्रवेश द्वारावरील कमानीची बंद असलेली लाईट सुरू करण्यात यावे आदि विषय यावेळी घेण्यात आले.