आजच्या जेनझी च्या संस्कारक्षम प्रतिकृती- निर्मितीची पंचक्रोशीतील गडकिल्ले प्रेमींकडून कौतुक !
विद्यानगर तरुण मित्र मंडळ- फोंडाघाटच्या युवाई कडून सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रेक्षणीय निर्मिती !
फोंडाघाट : कुमार नाडकर्णी– एकीकडे नरकासुर निर्मिती, दुष्पप्रवृत्तीचा विनाश करणारी, तर दीपावलीच्या पूर्वसंध्येवर आपल्या जिल्ह्याची अस्मिता गडांचा राजा सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती आर्टिस्ट शशांक गाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यानगर तरुण मित्र मंडळ फोंडाघाटच्या जेनझी- शालेय विद्यार्थी विद्यार्थीनी साकार करून पंचक्रोशीतील गड किल्ले प्रेमींचे लक्ष वेधून घेतले…
सुराज्यासाठी स्वराज्य निर्मिती आणि त्याच्या संरक्षणासाठी जलदुर्गाचे महत्त्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी, वास्तुशास्त्र पारंगत हिरोजी इंदुलकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली सन१६६४/६७ यादरम्यान मालवण अरबी समुद्रात, कुरटे नावाच्या बेटावर ह्या ऐतिहासिक जलदुर्गाची निर्मिती झाली. चोहीकडे फेसाळणारा- वादळी समुद्र, आणि त्याच्या मधोमध ४८ एकर मध्ये २२ बुरुजांनी समृद्ध या किल्ल्यावर, छत्रपती शिवरायांचे मंदिर, गोड्या पाण्याच्या विहिरी,मंदिरे आणि लपलेला महादरवाजा, परकीय आरमाराशी दोन हात करण्यास सज्ज बांधण्यात आला…
फोंडाघाट विद्यानगर येथील तरुण मित्र मंडळाने सिंधुदुर्ग किल्ल्याची दगड, माती पुतळे,रांगोळी यांनी प्रतिकृती हुबेहुब बनविताना इतिहास जागवला आहे. फेसळणारा निळा- पांढरा रंगी रांगोळीतून चहुबाजूने समुद्र- शिंपल्या, त्यात वाऱ्यावर डोलणाऱ्या छोट्या- छोट्या होड्या, लपलेला महादरवाजा, त्यावरील तोफखाना, छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी पुतळा, प्रत्येक बुरुजावरील दक्ष मावळे, किल्ल्याच्या आत १८ पगड जाती- धर्माच्या वस्त्या-पाडा, छत्रपतींच्या हातापायाचे ठसे व प्रतिमा असलेले शिवराजेश्वर मंदिर, दूधबाव, दहिबाव, आणि साखरबाव या गोड्या पाण्याच्या विहिरी, महापुरुष- भवानी आणि जरीमरीची भगवा डौलाने भगवा फडकणारी मंदिरे, असा अभ्यासपूर्ण गोष्टी या प्रतिकृती मध्ये साकारले आहेत बाजीप्रभूंचा लढतानाचा प्रेरणादायी पुतळा सर्वांना लक्षवेधीय ठरत आहे या प्रतिकृतीतून आजची जेनझी संस्कारक्षम, अभ्यासू असल्याचे प्रतिबिंबित होत आहे …
हा प्रेक्षणीय ऐतिहासिक किल्ला साकारण्यासाठी शशांक लाड,गणेश गोसावी, यांच्या मार्गदर्शनाखाली सोहम गोसावी, सौम्या डोरले, दर्शिल रावराणे, दिवेश रावराणे, भावेश पेडणेकर, अन्वय पारकर, गंधर्व दाभोळकर, चिन्मयी दाभोळकर, आराध्या नारकर, आराध्य पारकर, तनिष्का रेवडेकर या मित्र मंडळातील सर्वानी अभ्यासपूर्ण परिश्रम घेतले. हा किल्ला पाहण्यासाठी गड किल्लाप्रेमींनी भेट देऊन, मुलामुलींच्या स्तुत्य प्रतीकृतीचे कौतुक केले आहे….












