साळशी सरमळेवाडी शाळा व देवणेवाडी अंगणवाडीत नावीन्यपूर्ण अनोखा उपक्रम!
शिरगांव (प्रतिनिधी) :
दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा उत्सव! या उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत देवगड तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा साळशी सरमळेवाडी आणि अंगणवाडी साळशी देवणेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नावीन्यपूर्ण अनोखा पर्यावरणपूरक दिवाळी उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि कलाकौशल्यातून विविध आकर्षक आकाशकंदील तयार केले. रंगीबेरंगी कागद व सजावटीच्या साहित्याचा वापर करून सुंदर आकाशकंदील साकारण्यात आले. तसेच मातीच्या जुन्या पणत्यांना विविध रंगांनी रंगवून त्यांना आकर्षक स्वरूप देण्यात आले. या माध्यमातून पारंपरिक वस्तूंना नवे रूप देण्याचा उपक्रम विशेष ठरला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन, पुनर्वापर आणि संसाधनांचा योग्य वापर यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. ‘टाकाऊतून टिकाऊ’ आणि ‘निसर्गाचे रक्षण हीच खरी दिवाळी’ हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिला.
या उपक्रमात मुख्याध्यापक समाधान कोळी व सहशिक्षक वैभव येलेकर यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्त्व अंगणवाडी सेविका प्रतीक्षा शिवलकर व मदतनीस संध्या नाईक यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वनिर्मितीचा आनंद, श्रमप्रतिष्ठा, पारंपरिक कलेचे जतन आणि पर्यावरणाविषयी जबाबदारीची भावना निर्माण होण्यास मदत झाली. या उपक्रमाला पालक व ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमासाठी केंद्रसमन्वयक सुनील कोदले, शिक्षणप्रेमी राजेंद्र साटम, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आदिती रावले व उपाध्यक्षा मीनाक्षी देवणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.













