वंदे भारतला चिपळुणात थांबा द्या; मिलिंद कदम यांची रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण रेल्वेस्थानकातील प्रवाशांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासह वंदे भारत एक्स्प्रेसला चिपळुणात थांबा देण्याची मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आली. महासंघाचे चिपळूण रेल्वे स्टेशन अध्यक्ष मिलिंद काशीराम कदम यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी स्टेशन मास्तर शिल्पा दपके यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी स्टेशन मास्तर शिल्पा दपके, कमर्शियल सुपरवायझर स्वप्निल खांबे यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये फलाटावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था, प्रकाशयोजना, गर्दीच्या वेळी तिकीट खिडकीवर होणारी गैरसोय, गाड्यांचे थांबे, तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा या मुद्यांचा समावेश होता. स्थानक परिसरातील सुरक्षा आणि स्वच्छतेचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. या निवेदनावेळी उद्योजक रवींद्र खताल, सामाजिक कार्यकर्ते काशीराम कदम गुरुजी, सुरज साळवी यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी आणि रेल्वे प्रवासी उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यानंतर स्टेशन मास्तर शिल्पा दपके यांनी सर्व मुद्द्यांची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रवाशांना आवश्यक सुविधा लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे कमर्शियल सुपरवायझर स्वप्निल खांबे यांनी सांगितले. चिपळूण हे कोकण रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून, येथील प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा महासंघाचे अध्यक्ष मिलिंद कदम यांनी व्यक्त केली.