आधार सोशल फाउंडेशन, लांजा आणि पोलीस यांची संयुक्त बैठक संपन्न

आपत्ती व अपघात प्रसंगी पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याबाबत चर्चा

संतोष कोत्रे
लांजा-: आधार सोशल फाउंडेशन आणि लांजा पोलीस यांची संयुक्त बैठक आज शनिवारी लांजा पोलीस ठाणे येथे पार पडली. या बैठकीत आपत्ती किंवा अपघात प्रसंगी पोलीस यंत्रणेला सर्वतोपरी
सहकार्य करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आज लांजा पोलीस ठाणे येथे पार पडली. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून लांजा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. विशेषता आंजणारी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात आणि वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होत आहे. तसेच प्रवासी आणि वाहन चालक मोठ्या प्रमाणात जखमी होत आहेत. अपघात व विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण येत आहे.
या पार्श्वभूमीवर लांजा येथील आधार सोशल फाउंडेशन, लांजा या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारची आपत्ती, अपघात अथवा आपत्कालीन घटना घडल्यास पोलीस यंत्रणेला आवश्यक ते सहकार्य व मदत करण्याची ग्वाही दिली. सदर उपक्रमामुळे आपत्ती व अपघात प्रसंगी पोलीस यंत्रणा आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समन्वयाने मदतकार्य करणे शक्य होणार आहे.
दरम्यान, यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम तसेच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना
आपत्ती व अपघात प्रसंगी समन्वय साधणे, तातडीने मदतकार्य करणे तसेच पोलीस यंत्रणेशी संपर्क व सहकार्य ठेवणे याबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.
यावेळी आधार सोशल फाउंडेशन, लांजाचे
अविनाश जाधव, रणजीत सार्दळ, मंगेश लांजेकर, शिवप्पा उकली, नागेश कासार, राजू हळदणकर, समीर तानवडे, बापू जाधव, सचिन मडवे, प्रसाद भाईशेट्ये आदी उपस्थित होते.