ठाण्यात दिवाळीचा उत्साह द्विगुणित! अशोक वैती यांनी स्वतः वेळ काढून केली किल्ले आणि रांगोळी स्पर्धेची पाहणी; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद!

ठाणे : दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाही, तर संस्कृती, परंपरा, कला आणि बालपणातील आनंदाचा उत्सव! याच भावनेतून ठाण्यात दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला व रांगोळी स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
स्व. बारकू वैती प्रतिष्ठान, ठाणे आणि श्री साईधाम आनंद संस्था, काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्र मंडळ, ठाणे विभाग क्रमांक १३ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ३८ वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने सुरू झालेली ही सांस्कृतिक परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जात आहे. सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या किल्ला व रांगोळी स्पर्धेचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यंदाही ‘दिवाळी निमित्त भव्य किल्ला व रांगोळी स्पर्धा २०२६’च्या माध्यमातून परिसरात दिवाळीचा उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळत आहे.
या स्पर्धेत लहान मुलांनी आपल्या कल्पकतेतून आणि मेहनतीतून सुंदर गड-किल्ले साकारले आहेत. तर महिलांनी आणि तरुणींनी रंगीबेरंगी रांगोळ्यांच्या माध्यमातून आपली कलात्मकता दाखवली आहे. प्रत्येक किल्ल्यामागे मुलांची मेहनत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयीचे प्रेम आणि प्रत्येक रांगोळीमागे सर्जनशीलतेची सुंदर झलक पाहायला मिळत आहे.
या उपक्रमासाठी जनसेवक तथा ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून खास वेळ काढत स्वतः विविध ठिकाणी जाऊन किल्ले आणि रांगोळी सजावटीची पाहणी केली. यावेळी त्यांनी चिमुकल्यांशी संवाद साधत त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. अशोक वैती यांच्या भेटीमुळे मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला. आपण मेहनतीने साकारलेल्या कलाकृतीचे कौतुक करण्यासाठी मोठी व्यक्ती स्वतः आली, ही भावना चिमुकल्यांसाठी निश्चितच आनंददायी आणि प्रोत्साहन देणारी ठरली.
किल्ला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला ३,३३३ रुपये, द्वितीय क्रमांकाला २,२२२ रुपये, तर तृतीय क्रमांकाला १,१११ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाला २,२२२ रुपये, द्वितीय क्रमांकाला १,१११ रुपये आणि तृतीय क्रमांकाला ५५५ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
८ ते १० नोव्हेंबरदरम्यान सायंकाळी ६ ते ८ या वेळेत नागरिकांना किल्ले आणि रांगोळी सजावट पाहण्याची संधी मिळाली. साईनाथ नगर, रमाबाई नगर, लुईसवाडी, जिजामाता नगर, रामचंद्रनगर, काजूवाडी आणि वैतीनगर परिसरात या उपक्रमाचा उत्साह अनुभवायला मिळाला.
या उपक्रमाचा समारोप १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री साईबाबा मंदिर, सिद्धिविनायक चौक, काजूवाडी, ठाणे येथे भव्य दीपोत्सव सोहळ्याने करण्यात आला.
आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांना आपल्या संस्कृतीशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी आणि सणांच्या परंपरांशी जोडणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. तब्बल ३८ वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा म्हणजे केवळ स्पर्धा नसून सामाजिक एकोपा, सांस्कृतिक जतन आणि नव्या पिढीमध्ये ऐतिहासिक जाणिवा रुजविण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे.
मुलांच्या हातून साकारलेले छोटे छोटे किल्ले म्हणजे केवळ मातीची रचना नसून त्यातून जपली जाणारी स्वराज्याची प्रेरणा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या कलागुणांना मिळणारे प्रोत्साहन हाच या आयोजनाचा खरा पुरस्कार आहे.
या उपक्रमाचे आयोजक व अध्यक्ष अशोक बारकू वैती यांनी नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल आभार व्यक्त केले.