खरारे-पेंडूर येथे लोकसहभागातून बंधारा उभारणी

कै. संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान, वराडकर ज्युनिअर कॉलेज आणि ग्रामपंचायत खरारे-पेंडूर यांच्या संयुक्त उपक्रम

मालवण | प्रतिनिधी : सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्याबरोबरच भविष्यातील पाणीटंचाईची समस्या कमी करण्याच्या उद्देशाने कै. संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान, वराडकर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी व शिक्षक आणि ग्रामपंचायत खरारे-पेंडूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत खरारे-पेंडूर परिसरात बंधारा उभारण्यात आला.

पावसाचे पाणी वाहून न जाता ते अडवून जमिनीत मुरावे, भूजलपातळी वाढावी आणि आगामी काळात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. या कामासाठी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रितपणे श्रमदान करून बंधारा उभारणीत सहभाग घेतला.

लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जलसंधारणाच्या कामाला बळ मिळाले असून, पाणी संवर्धनाचा प्रभावी संदेशही देण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमदानातून जलसंधारणाचे महत्त्व जाणून घेतले. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा हा उपक्रम ठरला.

या वेळी संदेश उर्फ पप्या नाईक, प्रदीप सावंत पटेल, पप्या राणे, प्रशांत राणे, शेखर फोंडेकर, अमित सावंत, भाऊ घाडी, संतोष घाडी, भार्गव सावंत तसेच ग्रामपंचायत ग्रामसेविका व कर्मचारी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपत विविध घटकांनी एकत्र येऊन केलेल्या या उपक्रमामुळे भविष्यातील पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी स्थानिक पातळीवर जलसंधारणाची चळवळ उभी राहण्यास मदत होणार आहे. यापुढेही लोकसहभागातून पाणी संवर्धनाची विविध कामे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.