वैभववाडी भाजपमध्ये जुने-नवे असा कोणताही वाद नाही 

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केवळ विकासकामांवर चर्चा

हाणामारीच्या वृत्तात तथ्य नाही : सुधीर नकाशे, दिलीप रावराणे यांच्याकडून खुलासा

 वैभववाडी l प्रतिनिधी : 

वैभववाडी तालुक्यात भारतीय जनता पार्टीमध्ये जुने-नवे असा कोणताही वाद किंवा गटातटाच राजकारण नाही. सर्वच कार्यकर्ते सांघिक काम करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पक्ष संघटनेचे काम एकजुटीने सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी ठेकेदार संघटनेच्या दोन गटांत हाणामारी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, या वृत्तात कोणतेही तथ्य नसून वैभववाडीत असा कोणताही प्रकार घडलेला नाही, असा खुलासा भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे आणि ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष दिलीप रावराणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडी तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून होणाऱ्या विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक पूर्णपणे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बैठकीत कोणताही वाद, भांडण किंवा तंटा झाला नसून केवळ विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच वैभववाडीच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करत आहेत. वैभववाडी भाजपात कोणतेही गटतट नसून सर्व पदाधिकारी सांघिक भावनेने कार्यरत आहेत.

दरम्यान, खोटी माहिती पसरवून पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर अशा प्रकारांची गंभीर दखल घेऊन संबंधित पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सुधीर नकाशे आणि दिलीप रावराणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.