वैभववाडीत तणाव व्यवस्थापन व आत्महत्या प्रतिबंध प्रशिक्षण संपन्न

वैभववाडी l प्रतिनिधी :         वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मध्ये मानसशास्त्र, सामाजिक शास्त्र विभाग अंतर्गत तणाव व्यवस्थापन व्यवस्थापन व आत्महत्या प्रतिबंध या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण पार पडले. या प्रसंगी प्रा. बिना शेटे – कलंबटे रत्नागिरी, प्रा. राजेंद्र शिंत्रे सावंतवाडी यांनी मार्गदर्शन केले.

प्रा. बिना शेटे कलंबटे यांनी व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले, तणावाचा आपल्या मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आणि सामाजिक आरोग्यावर परिणाम होतो, यासाठी तणाव नियंत्रित कसा करता येईल, त्या उपाययोजनांवर त्यांनी चर्चा केली. प्रा. राजेंद्र शिंत्रे यांनी आत्महत्या होऊ नयेत याकरिता विद्यार्थ्यांनी व कोणत्याही व्यक्तीने आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर प्रथम सल्लामसलत केली पाहिजे. तेव्हा त्यातून काही मार्ग निघतो व हे चुकीचे विचार व्यक्तीच्या डोक्यातून बाहेर काढने आवश्यक असते. स्थानिक समिती सचिव प्रमोद रावराणे, सचिव यांनी अशा प्रकारच्या मार्गदर्शनची नितांत आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून प्रशिक्षण घेऊन आपल्या ग्रामसभेमध्ये या विषयावर चर्चा करावी याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

शरदचंद्र रावराणे, सज्जन काका रावराणे, प्राचार्य डॉ. नामदेव गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाकरिता विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. खारेपाटण कॉलेज व आयटीआय कॉलेज चे विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. आर. एम. गुलदे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निलेश कारेकर यांनी मानले.