आमदार किरण सामंत यांच्याकडून ५० लाखाचा निधी उपलब्ध
पाचल वार्ताहर : राजापूर तालुक्यातील पाचल येथील पी.एम.श्री जिल्हा परिषद गणेश विद्यामंदिर आदर्श शाळा नं. ५ या शाळेचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य व शैक्षणिक गुणवत्ता ही निश्चितच कौतुकास्पद व आदर्शवत आहे. या प्रशाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपण कायमच भक्कमपणे पाठीशी उभे राहू अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली आहे.
पाचल येथील जिल्हा परिषद गणेश विद्यामंदिर आदर्श शाळा नं. ५ या शाळेच्या वर्गखोल्यांच्या भूमीपुजन सभारंभ प्रसंगी आ. सामंत बोलत होते.या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागले, सभापती नंदिनी कदम, जिल्हा परिषद सदस्या सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासे, समिक्षा वाफीलकर, युवा तालुका प्रमुख सुनील गुरव, विभाग प्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव, पाचलचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, आप्पा साळवी, सुरेश ऐनारकर, संदीप बारसकर, युवराज मोरे, रवींद्र सावंत, विद्या लांजेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशाळेच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत आ. सामंत यांनी शाळेच्या तीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातुन या वर्गखोल्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.
जिल्हा वार्षिक योजना शाळा बांधकाम कार्यक्रमांतर्गत आमदार सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला होता. गुरूवारी जिल्हा परिषद सदस्या सिध्दाली मोरे व गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांच्या शुभहस्ते या वर्गखोल्यांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी शाळा व ग्रामस्थांच्या वतीने आमदार किरण सामंत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले यांनीही शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले. आमदार किरण सामंत यांनी आजपर्यंत सर्वाधिक निधी हा शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांसाठी दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितेले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते श्री. आण्णा पाथरे यांनी केले. या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते. शिक्षक, गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.













