मसुरे | झुंजार पेडणेकर
बिळवस – भोगलेवाडी सडा येथील रहिवासी सुनिल भोगले यांच्या घराला आणि घराबाहेर उभ्या असलेल्या सहा वाहनांना गुरुवारी अचानक आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. या भीषण आगीत घरगुती साहित्यासह वाहने जळून खाक झाल्याने भोगले कुटुंबाचे सुमारे सहा लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संकटकाळात भोगले कुटुंबाला सावरण्यासाठी महान गावचे सुपुत्र, माजी युवासेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक संग्राम सुधीर साळसकर यांनी माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे केला आहे.
घटनेची माहिती मिळताच संग्राम साळसकर यांनी तातडीने दखल घेत गुरुवारी सायंकाळीच घटनास्थळी धाव घेतली आणि भोगले कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच, या संकटातून सावरण्यासाठी साळसकर यांच्या वतीने सुनिल भोगले यांना तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. मालवण पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते ही आर्थिक मदत भोगले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी उद्योजक संग्राम साळसकर, शिवसेना विभागप्रमुख श्री. संतोष पालव, वेरळ सरपंच श्री. धनंजय परब, महान सरपंच श्री. अक्षय तावडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कठीण प्रसंगी वेळेवर धावून येत मोलाची आर्थिक मदत केल्याबद्दल सुनिल भोगले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संग्राम साळसकर व उपस्थित मान्यवरांचे मनापासून आभार मानले.













