सावंतवाडी शहरातील सार्वजनिक ठिकाणांची रंगरंगोटी

शहराला ‘अतिसुंदर’ बनवण्यासाठी नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांची विशेष मोहीम

सावंतवाडी । प्रतिनिधी :
​स्वच्छ आणि सुंदर अशी ओळख असलेल्या सावंतवाडी शहराला अधिक आकर्षक व ‘अतिसुंदर’ बनवण्यासाठी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, शहरातील सार्वजनिक ठिकाणांची रंगरंगोटी करून त्यांना नवा लूक दिला जात आहे.

​उपजिल्हा रुग्णालय परिसरातील पायऱ्यांचे रूप पालटले
मोती तलाव परिसरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या पायऱ्या गेल्या अनेक दिवसांपासून धूळखात पडून होत्या, ज्यामुळे परिसराला अवकळा आली होती. या बाबीची दखल घेत नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी या पायऱ्यांची तातडीने स्वच्छता व आकर्षक रंगरंगोटी करून घेतली आहे. या पहिल्याच पावलामुळे हा संपूर्ण परिसर आता स्वच्छ आणि मनमोहक दिसत आहे.

आगामी नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सावंतवाडीत देशी-विदेशी तसेच स्थानिक पर्यटकांची मोठी वर्दळ वाढणार आहे. पर्यटकांना शहराचे अधिक आकर्षण वाटावे, या उद्देशाने शहरातील अनेक वर्षे रंगरंगोटी न झालेल्या वास्तूंची देखभाल करण्याचा संकल्प नगराध्यक्षांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर व अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

सावंतवाडीचे मुख्य आकर्षण असलेल्या मोती तलावाकाठी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्र असलेला ‘केशवसुत कट्टा’ व येथील ‘तुतारी’ शिल्प आणि ‘गणेश विसर्जन कट्टा’ परिसरही रंगरंगोटीने सजवला जाणार आहे. सायंकाळच्या वेळी मोती तलाव व केशवसुत कट्ट्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसावे, यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.

नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांच्या या संकल्पनेला उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य व क्रीडा सभापती तथा भाजप शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. मुख्याधिकारी विनायक औंधकर, पालिकेचे सर्व कर्मचारी आणि शहरवासीयांच्या साथीने सावंतवाडीचा हा कायापालट केला जात आहे.