​सिंधुदुर्ग जिल्हा सहकार फेडरेशनतर्फे १७ रोजी पतसंस्थांची आढावा सभा

कुडाळ येथे होणार आयोजन

​सावंतवाडी,(प्रतिनिधी) :
जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती व पगारदार पतसंस्थांची आढावा सभा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने मंगळवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक १ वाजता कुडाळ तालुका खरेदी विक्री संघ मर्यादित, कुडाळ यांच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

​सभेतील मुख्य विषय:
सदर सभेत अंशदान, एमआयएस (MIS) प्रणालीमध्ये २०२५-२६ ची माहिती भरणे, आर्थिक निकषांची पूर्तता, सुधारित आदर्श उपविधी स्वीकारणे, सन २०२४-२५ व २०२५-२६ अखेरची लेखापरीक्षण व लेखापरीक्षण दोष दुरुस्ती पूर्तता या महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच या वेळी पतसंस्थांच्या सोनेतारण कर्जावर स्टॅम्प ड्युटी संदर्भाने चालू केलेल्या तपासणी व कारवाईबाबतही चर्चा केली जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरी, ग्रामीण बिगरशेती व पगारदार पतसंस्थांच्या अध्यक्ष, सचिव, व्यवस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभेच्या नोटिसेमध्ये नमूद केलेल्या माहितीसह वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी केले आहे.