आमदार सामंत यांच्या हस्ते भू शाखा नूतन वास्तू उद्घाटन
राजापूर (वार्ताहर): सहकार क्षेत्रात राजापूर तालुका कुणबी सह. पतपेढीने विश्वासार्हता व कार्यक्षमतेच्या जोरावर केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असून भविष्यात ही संस्था आणखी मोठी भरारी घेईल आणि लवकरच दोन हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा गाठुन संस्थेचे बँकेत रूपांतर होईल असे गौरवोद्गार आमदार किरण सामंत यांनी भू येथे काढले.
राजापूर तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेच्या भू शाखेचा आठवा वर्धापनदिन व नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा नुकताच आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी संस्थेच्या कार्याचा गौरव करताना पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात आमदार किरण सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तर मान्यवरांचे हस्ते संस्थेचे संस्थापक दादा नवाळे, ल. र.तथा भाईसाहेब हातणकर व स. म. कातकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर यांनी करून संस्थेच्या आणि भू शाखेच्या वाटचालीचा व कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा घेतला.
यावेळी रत्नागिरी जिल्हा डोंगरी विकास समितीचे सदस्य रवींद्र नागरेकर यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांनी सभासदांच्या विश्वासास पात्र राहून प्रामाणिकपणे व सेवाभावी वृत्तीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तर कुणबी समाजोन्नती संघ, राजापूर तालुका अध्यक्ष शिवाजी तेरवणकर यांनी भू शाखेच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. भू येथे शाखा सुरू करताना ती कुणबी पाचगाव मंडळाच्या इमारतीमध्ये असावी, असा मंडळाचा मानस होता. त्यानुसार संस्थेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुमारे ५०० चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, या वास्तूमधून संस्थेने सभासदांना अधिक चांगली व दर्जेदार सेवा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष दीपक नागले यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कार्याचा गौरव केला. तसेच राजापूर परिसरात नवीन उद्योगधंदे व औद्योगिक प्रकल्प सुरू झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यातून संस्थेच्या आर्थिक प्रगतीलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार किरण सामंत यांच्याकडे याबाबत लक्ष देण्याची विनंती केली.
. अध्यक्षीय भाषणात पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी संस्थेच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचा, आर्थिक प्रगतीचा, शाखा विस्ताराचा तसेच सभासद, ठेवीदार व कर्जदारांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांचा सविस्तर आढावा मांडला. संस्थेच्या प्रगतीमध्ये सभासदांचा विश्वास, ठेवीदारांचे सहकार्य, कर्जदारांची साथ, संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी पं. स. सभापती नंदिनी कदम, जि. प. सदस्य व संस्थेचे संचालक प्रकाश कुवळेकर, जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष विनायक शिवगण, संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, प्रवर्तक मंडळ सदस्य सुरेंद्र तांबे, पं. स. सदस्य राजेश गुरव तसेच मनोज कदम, प्रदीप सावंत, सिताराम निनावे, सिताराम पड्यार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शरद पाध्ये, प्रमोद पाध्ये, माजी संचालक लक्ष्मण सावंत, स्मिता पवार, पालक संचालक सोनू तिर्लोटकर, संचालक अविनाश नवाळे, रमेश सुद, सुरेश ऐनारकर, अनंत मोरवस्कर, अमृता शिवगण, स्वप्नील खटावकर, प्रथमेश सोगम, कर्ज वसुली अधिकारी श्रीकांत राघव, भू शाखाधिकारी प्राजक्ता डांबरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सर्वसाधारण सभासद, अधिकारी, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक कर्मचारी पिग्मी व आरडी एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्मचारी प्रतिनिधी प्रकाश भाबळे यांनी केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.













