कोल्हापूर अँटि करप्शन’च्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या गाडीचा भीषण अपघात एअरबँग उघडूनही दोन ठार

प्रतिनिधी /रोहन कांबळे

कोल्हापूर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी सुरेश पाटील ( वय ४०, रा.कळंबा रोड, कोल्हापूर, मूळ रा.चंद्रे, ता.राधानगरी) यांच्या कारला कर्नाटकातील चित्रदुर्ग ते कलबुर्गी महामार्गावर भीषण अपघात झाला. रविवारी (दि. ११) पहाटे चारच्या सुमारास झालेल्या अपघातात पाटील यांच्या आई कमल हरिभाऊ पाटील (वय ६९, रा. कांदे, ता. शिराळा, जि. सांगली) आणि कार चालक राकेश अर्जुन आयवाळे (३९, रा. निपाणी, जि. बेळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात उपअधीक्षक पाटील यांच्यासह त्यांच्या चुलती कुसुम प्रल्हाद पाटील (५७, रा. कांदे) आणि एसीबीचे कॉन्स्टेबल उदय दत्तात्रय पाटील (रा. कौलव, ता. राधानगरी) हे गंभीर जखमी झाले. रामेश्वर येथील देवदर्शन घेऊन परत येताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती चित्रदुर्ग येथील पोलिस उपअधीक्षक दिनकर पी. के. यांनी दिली.उपअधीक्षक वैष्णवी पाटील या त्यांच्या आई आणि चुलतीला देवदर्शन घडविण्यासाठी स्वत:च्या कारने दक्षिण भारतात गेल्या होत्या. कार्यालयातील कॉन्स्टेबल उदय पाटील यांना सोबत घेऊन त्या गुरुवारी कोल्हापुरातून बाहेर पडल्या होत्या. शनिवारी सायंकाळी रामेश्वर येथील देवदर्शन आटोपून ते परतीच्या मार्गाला लागले. रविवारी पहाटे चारच्या सुमारास कर्नाटकातील चित्रदुर्ग ते कलबुर्गी महामार्गावर तमताकल्लू गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार समोरच्या ट्रकवर आदळली.भीषण अपघातात चालक राकेश आयवाळे आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या कमल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. मागच्या सीटवर बसलेल्या उपअधीक्षक पाटील यांच्यासह त्यांच्या चुलती आणि कॉन्स्टेबल उदय पाटील जखमी झाले. चित्रदुर्ग पोलिसांनी तातडीने जखमींना चित्रदुर्ग येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.अपघाताची माहिती मिळताच पाटील कुटुंबीयांनी चित्रदुर्गकडे धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी कोल्हापूरकडे हलवण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. उपअधीक्षक पाटील यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. रात्रभर कार चालवल्याने पहाटेच्या सुमारास चालकाच्या डोळ्यावर झापड येऊन अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज चित्रदुर्ग पोलिसांनी वर्तवला आहे.