सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा
सावंतवाडी । प्रतिनिधी :
राज्यातील न्यायव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा तीव्र करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून आज दि. १७ रोजी सावंतवाडी दिवाणी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर न्यायालयातील वर्ग-क, बेलीप आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाला सावंतवाडी बार असोसिएशनचे (वकील संघटना) अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी उपस्थित राहून सर्व वकिलांतर्फे जाहीर पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (वर्ग-क), महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ कोर्ट्स एम्प्लॉईज, महाराष्ट्र राज्य न्यायवृंद वैद्य कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य न्यायालयीन वर्ग-४ कर्मचारी महासंघ यांच्या वतीने दिनांक १ जानेवारी २००६ पासून वेतनासंबंधीच्या प्रश्नावर आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी शासनाला महत्त्वपूर्ण निवेदन देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील कर्मचाऱ्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले.
या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय बेलीप संघटना व सिंधुदुर्ग जिल्हा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना प्रतिनिधी अभय चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय कर्मचारी संघटना (वर्ग-क) सावंतवाडी तालुका प्रतिनिधी गंगाधर तांबे, बेलीप संघटना प्रतिनिधी राजेंद्र सावंत यांच्यासह शरद पाटील, प्रसाद मराठे, विलास सावंत, संजय रावराणे, अतिश छजलांनी, मोतीराम जाधव, शुभम शिंदे, सौ. देसाई, सौ. ओटवणेकर, सौ. शिंदे आदी सर्व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवण्यात येईल, असा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांतर्फे देण्यात आला.












