नवनियुक्त प्रभारी मान्यवरांच्या स्वागतासह संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका आणि SIR प्रक्रियेवर होणार चर्चा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) काँग्रेस कमिटीची मासिक संघटनात्मक बैठक आणि नवनियुक्त प्रभारी मान्यवरांच्या स्वागत समारंभाचे आयोजन शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता काँग्रेस भवन, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, पक्षविस्तार आणि आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
या बैठकीला नवनियुक्त प्रभारी श्री. आकाश छाजेड (रत्नागिरी उत्तर व दक्षिण जिल्हा प्रभारी), श्री. शशांक बावचकर (रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी), श्री. अजिंक्य देसाई (रत्नागिरी प्रभारी), श्री. साईनाथ चव्हाण (राजापूर विधानसभा प्रभारी) तसेच श्री. यासिर बुबेरे (विभागीय अध्यक्ष, कोकण काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी नवनियुक्त प्रभारी मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे.
बैठकीत जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून तालुकानिहाय संघटनात्मक आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे. आगामी काळातील राजकीय आव्हाने, पक्षविस्तार, जनसंपर्क अभियान, संघटनात्मक बांधणी तसेच काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे.
याशिवाय सर्व ब्लॉक चौपाल बैठकांचे नियोजन, एस.आय.आर. (SIR) प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, बीएलए-२ (BLA-2) नियुक्ती तसेच मतदार यादीसंदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनेही या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, तालुका पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल, एनएसयूआय तसेच पक्षाच्या विविध आघाड्या, सेल, प्रकोष्ठ आणि विभागांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी केले आहे.













