देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिरांतर्गत सोनवडे गावात जनजागृती प्रभात फेरी, व्यसनमुक्तीविषयक सर्वेक्षण आणि ग्रामस्वच्छता उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमांतर्गत स्वयंसेवकांनी गावातून प्रभात फेरी काढून व्यसनमुक्ती, नशामुक्ती आणि टीव्हीमुक्त जीवनशैली याविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. तसेच गावातील नागरिकांशी संवाद साधून व्यसनमुक्ती व टीव्हीच्या अतिवापरासंदर्भात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामस्थांनी स्वयंसेवकांना सहकार्य करून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमादरम्यान सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकरजी सनगरे यांच्या निवासस्थानीदेखील स्वयंसेवकांनी सर्वेक्षण केले. त्यांनी स्वयंसेवकांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याचबरोबर स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छता उपक्रमांतर्गत गावातील मंदिर परिसर, ग्रामपंचायत परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. श्रमदानातून परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देण्यात आला. या सर्व उपक्रमांसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. सीमा कोरे, प्रा.मयुरेश राणे, प्रा. अभिनय पातेरे प्रा. स्वप्नाली झेपले आणि प्रा. वसंत तावडे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. जनजागृती, सामाजिक सर्वेक्षण आणि श्रमदान यांच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत ग्रामविकासाचा संदेश दिला. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.













