मंडणगडच्या तीन जनप्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन

युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचा पुढाकार; २५ विभागांचे वेधले लक्ष

मंडणगड (प्रतिनिधी)  : मंडणगड तालुक्यातील तीन महत्त्वाच्या जनप्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना २० नोव्हेंबर २०२६ रोजी संयुक्त निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्र्यांसह एकूण २५ विभागांना पाठविण्यात आले आहे. निवेदनात तुळशी व चिंचाळी धरणातील पाणीउपसा, पाणीवाटप व स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्याचा हक्क सुरक्षित ठेवणे, मंडणगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहावरील जीर्ण नामफलक तातडीने बदलणे, तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असलेल्या आंबडवे गावाकडे जाणाऱ्या रखडलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, या तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
धरणांतील पाणीसाठा व परवानग्यांची चौकशी, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, नवीन नामफलकाची उभारणी आणि आंबडवे रस्त्याच्या कामाला गती देऊन निश्चित कालमर्यादा जाहीर करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हे प्रश्न राजकीय नसून जनतेच्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहेत. प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी केली आहे.