मार्लेश्वर तीर्थक्षेत्री आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून ड्रोनद्वारे सखोल तांत्रिक पाहणी

डोंगराची सद्यस्थिती आणि अतिधोकादायक भागांचा घेतला प्राथमिक आढावा

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर तीर्थक्षेत्र येथील डोंगरावरून दरडी आणि दगड कोसळण्याच्या संभाव्य धोक्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने आता ठोस पावले उचलली आहेत. शुक्रवारी आयआयटी मुंबईच्या अधिपत्याखालील तज्ज्ञ सल्लागारांच्या पथकाने मार्लेश्वर परिसराची ड्रोनद्वारे सखोल तांत्रिक पाहणी केली. या सर्वेक्षणातून डोंगराची सद्यस्थिती आणि अतिधोकादायक भागांचा प्राथमिक आढावा घेण्यात आला आहे.
​
काही दिवसांपूर्वी मार्लेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या सांगलीतील एका कुटुंबावर डोंगरावरून दगड कोसळल्याने चार वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार किरण सामंत यांनी डोंगराची तज्ज्ञांमार्फत तांत्रिक तपासणी करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आमदारांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (देवरुख उपविभाग) वतीने या स्थळ पाहणीचे नियोजन करण्यात आले होते. ड्रोनच्या साहाय्याने डोंगराच्या दुर्गम भागांचे चित्रण आणि भौगोलिक माहिती संकलित करण्यात आली आहे. या माध्यमातून डोंगराची नेमकी भूगर्भीय परिस्थिती तपासली जाईल.

​दरडी किंवा दगड कोसळण्याची संभाव्य ठिकाणे निश्चित केली जातील. या अभ्यासाचा सविस्तर अहवाल तयार करून भाविकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण पाहणीवेळी देवरूख सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अक्षय पवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद सावंत, उबाठा तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर यांच्यासह विनायक सावंत, अविनाश सावंत, प्रशांत सावंत, प्रवीण सावंत, बाळकृष्ण ब्रीद, योगेश लिंगायत, अमोल गुरव आणि नंदकुमार गुरव आदी उपस्थित होते.