कांदळवन विभागाकडून निधी उपलब्ध न झाल्याने स्थानिक व्यावसायिकांचा पुढाकार; प्रत्येक शनिवार-रविवारी बीच क्लीनिंग मोहीम राबविण्याचा निर्णय
मंडणगड (प्रतिनिधी) : कासव संवर्धन मोहिमेमुळे जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेल्या वेळास समुद्रकिनाऱ्यावर सध्या मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांचा खच साचला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील वाढत्या अस्वच्छतेमुळे पर्यावरणाला तसेच पर्यटनाच्या दृष्टीने गावाच्या प्रतिमेला धोका निर्माण होत असताना कच-या मुळे कासव हंगामात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन वेळास येथील होमस्टेधारकांनी स्वतः पुढाकार घेत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. वेळास गावात कासव संवर्धन मोहिमेच्या निमित्ताने येणाऱ्या पर्यटकांसाठी घरगुती निवासाची (होमस्टे) व्यवस्था करणारे स्थानिक व्यावसायिक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात जमा झालेला प्लास्टिक कचरा, काचेच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तू पाहून होमस्टेधारकांनी बैठक घेतली. या बैठकीत केवळ प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता गावाच्या समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता स्वतः करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता प्रत्येक शनिवार आणि रविवार नियमितपणे बीच क्लीनिंग मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पर्यटकांना स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा अनुभवता यावा, तसेच कासव संवर्धनासाठी पोषक असलेले नैसर्गिक वातावरण टिकून राहावे, हा या मोहिमेमागील प्रमुख उद्देश आहे., समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी कांदळवन विभागाकडे निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र, मागणी करूनही अद्याप निधी उपलब्ध झालेला नसल्याने स्थानिक होमस्टेधारकांना स्वतःच स्वच्छतेची जबाबदारी उचलावी लागत असल्याचे चित्र आहे. वनविभागाच्या कांदळवन समितीकडे वारंवार मागणी करूनही अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबाबत स्थानिक व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कासव संवर्धनासाठी वेळास गावाने अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक पर्यटनाची ओळख जपली आहे. अशा परिस्थितीत समुद्रकिनाऱ्यावर साचणारा प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांचा कचरा हा केवळ स्वच्छतेचा प्रश्न नसून सागरी पर्यावरण आणि कासवांच्या अधिवासाच्या दृष्टीनेही चिंतेचा विषय आहे.
प्रशासनाने या स्वच्छता मोहिमेची दखल घेऊन आवश्यक निधी, स्वच्छता साहित्य आणि कचरा संकलनाची कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा वेळासमधील होमस्टेधारकांकडून व्यक्त होत आहे. गावाच्या पर्यटनाची आणि पर्यावरणाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून स्थानिक नागरिकही ती तितक्याच जाणीवेने पार पाडत असल्याचे वेळासमधील होमस्टेधारकांच्या या उपक्रमातून दिसून येत आहे.













