देवरूख कनिष्ठ महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरात ‘युवा आणि अनुशासन’ विषयावर नेहा जोशी यांचे मार्गदर्शन

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत माध्यमिक विद्यालय, सोनवडे येथे आयोजित सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिरांतर्गत ‘युवा आणि अनुशासन’ या विषयावर संस्था उपाध्यक्षा नेहा जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी युवकांच्या जीवनातील शिस्तीचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात वेळेचे नियोजन, नियमितता, आत्मसंयम, सकारात्मक विचार आणि जबाबदारीची जाणीव जोपासली पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

युवकांनी केवळ स्वतःच्या विकासाचा विचार न करता, समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारावी असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनातून स्वयंसेवकांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली. व्याख्यानाच्या सुरुवातीला नेहाताई जोशी यांचे स्वागत सोनवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी बंडगर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. प्रा. मयुरेश राणे यांनी प्रास्ताविक व स्वागतपर मनोगत व्यक्त करून वक्त्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमासाठी प्रा. प्रवीण जोशी, प्रा. विजय मुंडेकर, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. स्वप्नाली झेपले उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. वसंत तावडे यांनी केले. या व्याख्यानातून स्वयंसेवकांना जीवनातील शिस्त, स्वयंविकास आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली.