रमाई नदीवरील पक्क्या बंधाऱ्याचे बंदिस्तीकरण!

 ▪️जलसंधारण, शेती आणि खारट पाण्यापासून संरक्षणाचा यशस्वी उपक्रम

मसुरे | झुंजार पेडणेकर 

मसुरे बाजारपेठ नजिक रमाई नदी वर बांधण्यात आलेला पक्का बंधारा हा परिसरातील जलसाठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या बंधाऱ्याला पाणी अडविण्यासाठी फायबर प्लेट बसविण्यात येतात. मात्र, मागील वर्षी काही फायबर प्लेट तुटून खराब झाल्यामुळे यावर्षी बंधाऱ्यात पाणी अडविणे कठीण बनले होते.

बंधाऱ्याचा विस्तार मोठा असल्याने पर्यायी व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या लाकडी फळ्यांचे प्रमाणही अधिक होते. वेळेत पाणी अडविले गेले नसते तर काही अंतरावर असलेल्या कालावल खाडी पात्रातून नदीवाटे मोठ्या प्रमाणात खारे पाणी देऊळवाडा, मेढा, गडघेरा, मागवणे आदी भागात शिरण्याचा धोका निर्माण झाला होता.

सध्याची पाण्याची निकड आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजी परब, राजेश गावकर, तात्या हिंदळेकर, सचिन पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने उपाययोजना करण्यात आली. महसूल मंडळ अधिकारी श्री. शिंग्रे, ग्रामपंचायत अधिकारी शंकर कोळसुलकर, कृषी विभागाचे श्री चव्हाण, श्री इंगोले यांचे सुद्धा सहकार्य लाभल्याची माहिती श्री.ठाकूर यानी दिली.बंधाऱ्याचे बंदिस्तीकरण करून पाणी अडविण्यासाठी सुमारे 32 हजार रुपये खर्च करून लाकडी फळ्या बसविण्यात आल्या अशी माहिती ठाकूर यानी दिली. यामुळे तुटलेल्या फायबर प्लेटमुळे निर्माण झालेली अडचण यशस्वीरीत्या दूर करण्यात आली.

नदीतील गोड्या पाण्याचे प्रमाण टिकून राहून मोठा जलसाठा उपलब्ध होणार आहे.

हजारो एकर शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन पिकांना आधार मिळणार आहे.

परिसरातील विहिरी व भूजल पातळीत सुधारणा होऊन पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. कालावल खाडीतून येणारे खारे पाणी देऊळवाडा व मागवणे परिसरात शिरण्यास प्रतिबंध होणार असून जमिनीची सुपीकता व गोड्या पाण्याचे स्रोत सुरक्षित राहणार आहेत.

तसेच यावर्षी उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करणे शक्य होईल.

मसुरे बाजारपेठ नजिक रमाई नदीवरील बंधाऱ्याचे लाकडी फळ्यांच्या माध्यमातून केलेले बंदिस्तीकरण हे वेळेवर घेतलेल्या निर्णयाचे आणि प्रभावी नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे. या कामामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि खारट पाण्यापासून जमिनीचे रक्षण या तिन्ही पातळ्यांवर मोठा दिलासा मिळणार असून, इतर भागातील जलसंधारण उपक्रमांसाठी हा एक प्रेरणादायी आदर्श आहे. रमाई नदीवरील या बंधाऱ्याचे पाणी अडविण्यासाठी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांनी स्वखर्चाने व सहकाऱ्यांच्या साथीने जो पुढाकार घेतला आहे तो परिसरातील शेतकऱ्यांच्या घामाचे आणि कष्टाचे मोल जपणारा मायेचा हात आहे. तुटलेल्या फायबर प्लेटमुळे निर्माण झालेला पेच आणि खारट पाण्याचा संभाव्य धोका ओळखून त्यांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी मसुरे, देऊळवाडा, मागवणे व आजूबाजूच्या गावांसाठी खरोखरच दिलासादायक ठरली आहे. आपल्या हक्काच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी केलेल्या उपाययोजना समस्त ग्रामस्थांच्या व शेतकऱ्यांच्या मनात कायम कृतज्ञतेची भावना निर्माण करणारा आहे.

या अनमोल प्रयत्नांतून साठलेल्या या जीवनदायी पाण्याचा सर्व शेतकरी बांधवांनी काटकसरीने व योग्य नियोजनाने वापर करून आपली शेती फुलवावी, पिके समृद्ध करावीत आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या संधीचे सोने करावे, हीच अपेक्षा ठाकूर यानी व्यक्त केली आहे.