बोर्ड परीक्षेच्या निकालात गुणवत्तेसाठी कृती आराखडा

दहावी, बारावीच्या निकालाचे विश्लेषण करून आगामी परीक्षेसाठी शाळांना लक्ष्य निश्चितीचे निर्देश

रत्नागिरी : प्रतिनिधी

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेतील निकालात केवळ उत्तीर्णतेची टक्केवारी न पाहता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाने फेब्रुवारी–मार्च २०२७ परीक्षेसाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना निकालाचे सखोल विश्लेषण करून गुणवत्तावाढीचे उद्दिष्ट निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

२०२६ च्या परीक्षेतील निकालाचा आधार घेऊन २०२७ च्या परीक्षेत विद्यार्थ्यांची गुणश्रेणीनुसार संख्या वाढवणे, कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करणे, तसेच विषयवार कामगिरी सुधारणे यासाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे निकाल १०० ते ७५ टक्के, ७५ ते ६० टक्के, ६० ते ४५ टक्के, ४५ ते ३५ टक्के आणि ० ते ३५ टक्के अशा गुणश्रेणींमध्ये विभागून विश्लेषण करण्याचे निर्देश आहेत. प्रत्येक शाळेने मागील परीक्षेतील विद्यार्थ्यांची संख्या, गुणश्रेणीनुसार कामगिरी आणि आगामी परीक्षेसाठी अपेक्षित वाढ याची नोंद ठेवायची आहे.
उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवतानाच कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन, सराव आणि उपचारात्मक अध्यापन देण्यावर भर देण्यात आला आहे.

भाषा विषयांमध्ये लेखन, व्याकरण, आकलन आणि उत्तरलेखन कौशल्य सुधारण्यासाठी नियमित सराव घेण्यात येणार आहे. विज्ञान विषयात संकल्पना स्पष्ट करणे, आकृत्या, प्रात्यक्षिके आणि लेखी परीक्षेतील कामगिरी सुधारण्यावर भर राहणार आहे. गणित विषयात मूलभूत संकल्पना, उदाहरणे आणि सराव प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांची क्षमता वाढवण्याचे नियोजन आहे.
शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतंत्र प्रगती नोंदवून कमकुवत घटक ओळखावेत आणि त्यानुसार वैयक्तिक मार्गदर्शन करावे, असेही निर्देश आहेत.

मुख्याध्यापक, विषय शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाने नियमित बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घ्यायचा आहे. घटक चाचण्या, सराव परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणी, पालक संवाद आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सुधारणा करायच्या आहेत.

केवळ निकाल वाढवण्याचे लक्ष्य नाही, तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा हा प्रयत्न आहे. फेब्रुवारी–मार्च २०२७ च्या बोर्ड परीक्षेत गुणवत्तावाढ साधण्यासाठी शाळांना आतापासूनच नियोजनबद्ध तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-राजेश क्षीरसागर
(कोकण-कोल्हापूर विभागीय मंडळ अध्यक्ष)