धार्मिक क्षेत्रातील कार्यासोबतच भाजपमध्येही विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र आध्यात्मिक प्रकोष्ठाच्या ठाणे-कोकण प्रदेश सहसंयोजकपदी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील संस्थान श्री देव श्री क्षेत्र गणपतीपुळेचे मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी २४ नोव्हेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली.
घनवटकर यांच्या धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. धार्मिक क्षेत्रातील कार्यासोबतच त्यांनी भारतीय जनता पक्षात यापूर्वी विविध संघटनात्मक पदांवर काम केले आहे. दक्षिण रत्नागिरी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, रत्नागिरी युवा मोर्चाचे तालुका चिटणीस तसेच बूथ प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. पक्ष संघटनेतील या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर आता आध्यात्मिक प्रकोष्ठाच्या प्रदेशस्तरीय जबाबदारीची धुरा सोपविण्यात आली आहे.
अभिजीत घनवटकर हे पुजारी परंपरेतील नवव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू लंबोदर गणेश मंदिरात ते मुख्य पुजारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी श्री क्षेत्र सज्जनगड येथे तीन वर्षे पुजारी सेवक आणि अध्यापक म्हणून सेवा बजावली आहे. नित्यपूजा, धार्मिक विधी, पूजाविधी तसेच भाविकांना धार्मिक परंपरा आणि आध्यात्मिक विषयांबाबत मार्गदर्शन करण्याचे कार्य ते करतात.
धार्मिक कार्यासोबतच वेदाध्ययन, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, कीर्तन आणि प्रवचन परंपरेचा अभ्यास व प्रसार यामध्येही त्यांना विशेष रुची आहे. मराठा ज्योतिष मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत.
श्री क्षेत्र गणपतीपुळेच्या पौराणिक, ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरांचा अभ्यास करणे, मुद्गल पुराणातील लंबोदर गणेश महात्म्य तसेच स्वयंभू लंबोदर गणेशाचे क्षेत्रमहात्म्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गोसेवा, गोसंगोपन, धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम आणि सनातन धर्माच्या परंपरांचे संवर्धन यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
आजच्या डिजिटल युगात तरुण पिढीपर्यंत धर्म, अध्यात्म आणि भारतीय संस्कृतीचे योग्य ज्ञान पोहोचावे, यासाठी ते यूट्यूब, फेसबुक आणि पॉडकास्टसारख्या माध्यमांचा वापर करून धार्मिक विषयांवर संवाद आणि जनजागृती करण्यावर भर देत आहेत.
भाजपच्या आध्यात्मिक प्रकोष्ठाच्या माध्यमातून ठाणे आणि कोकण विभागात धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देणे, सनातन धर्म आणि धार्मिक परंपरांचे संवर्धन करणे तसेच समाजामध्ये धार्मिक मूल्ये आणि संस्कार रुजविण्यासाठी कार्य करणे, अशी अपेक्षा त्यांच्या नव्या जबाबदारीतून व्यक्त होत आहे.
घनवटकर यांच्या नियुक्तीबद्दल धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.













