खेड (प्रतिनिधी) : स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित झालेले कळंबणी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. भगवान दगडू साळुंके यांचा वाळंजवाडी ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण खेड तालुक्यात त्यांचे कौतुक होत असून ग्रामविकासातील त्यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
रविवार, दिनांक 29 मार्च 2026 रोजी आयोजित या सत्कार समारंभात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास जि. प. सदस्या सौ. मानसी जगदाळे, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, सरपंच संघटना अध्यक्ष दिनेश चव्हाण, उधळे गावचे सरपंच दयानंद पाष्टे, शांताराम म्हसकर, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम येरापले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. साळुंके यांच्या कार्याचा गौरव करताना ग्रामविकासासाठी त्यांनी राबवलेल्या विविध योजनांचे विशेष कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली कळंबणी बु. ग्रामपंचायतीने विकासाच्या दिशेने टाकलेली भक्कम पावले ही इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सत्कार कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भरत आयरे, विशाल महाडीक आणि राजेश आयरे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण यांनी प्रभावीपणे केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.










