७ लाख ८० हजारांचा गोवा दारू साठा जप्त

चिपळूणमध्ये राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई

चिपळूण (प्रतिनिधी):-राज्य उत्पादन शुल्क विभाग, चिपळूण यांनी शहरानजीकच्या कळंबस्ते गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर कारवाई करत गोवा बनावटीच्या विदेशी दारूची मोठी वाहतूक उधळून लावली आहे. या कारवाईत ४० बॉक्स दारू आणि इनोव्हा गाडी असा एकूण ७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली आणि फक्त गोवा राज्यात विक्रीस असलेली गोवा निर्मित विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली.

या कारवाईत टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडी (क्र. MH-04-EH-4656) पकडण्यात आली. गाडीतून ४० बॉक्स म्हणजेच ३४५.६० बल्क लिटर गोवा निर्मित विदेशी दारू जप्त करण्यात आली. या दारूची किंमत ४ लाख ८० हजार रुपये असून, गाडीची किंमत ३ लाख रुपये आहे.

गाडीच्या आरटीओ नोंदणीनुसार गाडी मालकाचे नाव संकेत पि. पांडुरंग राठोड, वय ३२ वर्षे, रा. चव्हाणवाडी, पो. हनेगाव, ता. देगलूर, जि. नांदेड असे निष्पन्न झाले आहे. सदर इसम फरारी झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), ९० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनिल आरडेकर, दुय्यम निरीक्षक संजय मालुसरे, जवान वैभव सोनावले, शुभम काडापुरे, मयूर पुरीबुवा आणि जवान-नि-वाहनचालक विशाल विचारे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक सुनिल आरडेकर हे करत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात कुठेही परराज्यातील अवैध दारूची वाहतूक व साठा, हातभट्टी दारू निर्मिती, विक्री, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास विभागाच्या व्हाट्सअप क्र. ८४२२००११३३ व टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.