सावंतवाडी नगरपरिषदेचा कोलगाव हद्दीवरील अतिक्रमणांवर ‘हातोडा ‘
मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने अतिक्रमण हटाव मोहीम
शहरातील अन्य अतिक्रमणेही हटवण्याची नागरिकांची मागणी
अनधिकृत स्टॉलमधून अवैध धंद्यांचे अड्डे त्यामुळेच कारवाई : नगराध्यक्षांची माहिती
सावंतवाडी । प्रतिनिधी :
शहरातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात सावंतवाडी नगरपरिषदेने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने कोलगाव हद्दीवरील रस्त्यालगत असलेले अनधिकृत स्टॉल्स हटवण्याची धडक कारवाई करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, या मोहिमेचे स्वागत करतानाच मुख्य बाजारपेठ आणि शहराच्या इतर भागातील अतिक्रमणेही हटवण्याचे धाडस प्रशासनाने दाखवावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि स्टॉलधारकांकडून होत आहे.
*पार्किंग आणि पदपथावरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी*
नगरपरिषदेने केवळ शहराच्या हद्दीवरील स्टॉल्सवर कारवाई न करता शहराच्या मुख्य बाजारपेठेतील व परिसरातील अतिक्रमणे देखील दूर करावीत, अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात काही व्यावसायिक इमारतींच्या बाहेर तसेच इमारतींसाठी राखीव असलेल्या पार्किंगच्या जागेत व पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. काही व्यावसायिक इमारतींच्या पार्किंगच्या भागात संबंधित गाळेधारकांनी गाड्या उभ्या करून चक्क पोटभाडेकरू नेमल्याचेही निदर्शनास आले आहे. यामुळे पादचाऱ्यांना व वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होत असून, ही अतिक्रमणे त्वरित हटवून सुंदर सावंतवाडी शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
*प्रशासनाकडून नोटीसा आणि यापूर्वीची कारवाई*
गेल्या काही दिवसांपासून नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमणाविरोधात कडक पावले उचलली जात आहेत. शहरातील अनेक अनधिकृत स्टॉलधारक, अतिक्रमण केलेले दुकानदार व व्यावसायिकांना पालिकेकडून यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत याआधी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या मुख्य दरवाजासमोर असलेले काही अनधिकृत स्टॉल्स हटवून पालिकेने जप्त केले होते. त्या कारवाईनंतर शहरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काही राजकीय पक्षांनी या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध दर्शवत, आधी संबंधित स्टॉलधारकांची इतरत्र पर्यायी व्यवस्था करावी आणि त्यानंतरच स्टॉल्स हटवावेत, अशी भूमिका घेतली होती.












