प्लास्टिकमुक्त खेडसाठी पुन्हा जनजागृती आणि कठोर कारवाईची गरज; अल सफा वेल्फेअर फाउंडेशनचे आवाहन

६ ते ८ महिन्यांच्या मोहिमेनंतरही शहरात पुन्हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू; नागरिक, व्यापारी आणि प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन

खेड (प्रतिनिधी) : पृथ्वीचे पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी पाणी वाचवणे आणि एकल वापराच्या प्लास्टिकला नकार देणे ही काळाची गरज बनली आहे. खेड शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने अल सफा वेल्फेअर फाउंडेशन, खेड आणि खेड नगरपरिषद यांच्या संयुक्त पुढाकाराने गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून शहरात प्लास्टिकविरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मात्र, या मोहिमेनंतरही शहरात पुन्हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाल्याचे नुकत्याच केलेल्या पाहणीत निदर्शनास आल्याने प्लास्टिकमुक्त खेडच्या संकल्पनेला अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
या मोहिमेदरम्यान नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी कापडी तसेच पर्यायी कॅरीबॅगचे वाटप करण्यात आले. प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश देण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली, तर स्थानिक प्रसारमाध्यमांनीही या उपक्रमाला सहकार्य केले. नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, जलप्रदूषण, कचरा व्यवस्थापनातील अडचणी तसेच निसर्गाला होणारे नुकसान याबाबत जागृती करण्यात आली. त्याचबरोबर प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईची अंमलबजावणीही करण्यात आली. मात्र इतके प्रयत्न करूनही शहरात पुन्हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाल्याने जनजागृतीबरोबरच प्रत्यक्ष कृती आणि सातत्यपूर्ण नियंत्रण आवश्यक असल्याचे फाउंडेशनने अधोरेखित केले आहे. प्लास्टिकमुक्त खेड ही केवळ एखाद्या सामाजिक संस्थेची किंवा नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिक, व्यापारी, दुकानदार आणि विक्रेत्यांची सामूहिक जबाबदारी आहे. ग्राहकांकडून प्लास्टिक पिशव्यांची मागणी होत राहिली आणि दुकानदारांकडून त्यांचे वितरण सुरू राहिले, तर प्लास्टिकविरोधी मोहिमेला अपेक्षित यश मिळणे कठीण असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी नागरिकांनी बाजारात जाताना स्वतःच्या कापडी पिशव्या सोबत ठेवाव्यात आणि दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या स्वीकारणे बंद करावे. दुकानदारांनी प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वितरण करू नये, तसेच प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. खेड नगरपरिषदेने नियमित तपासणी करून दंडात्मक कारवाई सातत्याने सुरू ठेवावी. प्रत्येक दुकानाबाहेर ‘प्लास्टिक पिशव्यांना नकार’ असा संदेश देणारा फलक लावून ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
प्लास्टिकमुक्त खेड घडविण्यासाठी पुन्हा एकदा व्यापक जनजागृती मोहीम राबविणे आणि त्यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे गरजेचे आहे. केवळ जनजागृती करून थांबण्याऐवजी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर टाळण्याची सवय अंगीकारली पाहिजे. प्लास्टिकची मागणी, पुरवठा आणि विक्री या तिन्ही स्तरांवर नियंत्रण आले, तरच शहर प्लास्टिकमुक्त होण्याच्या दिशेने ठोस पाऊल पडू शकते.
आज प्लास्टिकला नकार देऊन पर्यावरण संवर्धनासाठी कृती केली, तर भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण उपलब्ध करून देता येईल. ‘पृथ्वी वाचवा, पाणी वाचवा आणि प्लास्टिकमुक्त खेड घडवा’ हा संदेश देत अल सफा वेल्फेअर फाउंडेशनने नागरिक, व्यापारी आणि नगरपरिषद प्रशासनाला या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.