परशुराम हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन; महिलांसाठी आय-ब्रेस्ट तपासणी, स्पायरोमेट्री व रक्तातील साखरेची तपासणी
खेड प्रतिनिधी : नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खेड नगरपरिषद दवाखाना येथे खेड नगरपरिषद आणि परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घाणेखुंट-लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, २६ नोव्हेंबर रोजी मोफत सर्वरोग तपासणी व विशेष वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
या शिबिरात विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. मेडिसिन तज्ज्ञ, शस्त्रक्रिया तज्ज्ञ, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ तसेच पंचकर्म तज्ज्ञांच्या माध्यमातून विविध आजारांची तपासणी व प्राथमिक निदान करण्यात आले. नागरिकांना वेळेत आरोग्य तपासणी करून संभाव्य आजारांबाबत जागरूक राहता यावे, तसेच आवश्यक उपचारांची माहिती मिळावी, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
शिबिरामध्ये महिलांसाठी विशेष आय-ब्रेस्ट तपासणी, फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्पायरोमेट्री तपासणी आणि रक्तातील साखरेची तपासणी अशा महत्त्वपूर्ण वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. याशिवाय उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणून घेत आवश्यक सल्ला व मार्गदर्शन केले.
या शिबिराला खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतिश उर्फ पप्पू चिकणे, सभापती तौसिफ खोत, नगरसेवक आरिफ मुल्लाजी, महिला सभापती रसिका खेडेकर, सौ. वर्षा सापटे, नगरसेवक स्वप्नील सेतवडेकर, तुषार सापटे, दीपक चव्हाण व संतोष जाधव यांची उपस्थिती होती. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. पोळ, डॉ. जाधव तसेच हॉस्पिटलमधील कर्मचारी वर्गाने शिबिरासाठी विशेष सहकार्य केले.
खेड नगरपरिषदेकडून नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, मोफत तपासणी शिबिरामुळे सर्वसामान्य नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेण्याची संधी उपलब्ध झाली. भविष्यातही नागरिकांच्या आरोग्यहितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.













