नारंगी नदी परिसरात पहिल्या वनराई बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेतून दुष्काळमुक्त खेडच्या दिशेने पाऊल
खेड प्रतिनिधी : वाढदिवस केवळ उत्सव आणि आनंदापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा आदर्श भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी घालून दिला आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी जलसंवर्धनाचा अनोखा संकल्प केला असून, खेड तालुक्यात २५ वनराई बंधारे उभारण्याच्या व्यापक मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेतील पहिल्या वनराई बंधाऱ्याच्या उभारणीचा शुभारंभ नारंगी नदी परिसरात ॲड. वैभव खेडेकर यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला.
खेड शहर आणि तालुक्यात भविष्यात पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये, उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कायम राहावी आणि स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत पुनर्भरणासाठी उपयोग व्हावा, तसेच परिसरातील पाणीसाठ्यात वाढ होऊन नागरिकांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, या दृष्टीने वनराई बंधारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाढदिवसानिमित्त नारंगी नदी परिसरात उभारण्यात आलेला पहिला वनराई बंधारा हा केवळ एका सामाजिक उपक्रमाचा प्रारंभ नसून, खेड तालुक्यात जलसंवर्धनाची व्यापक चळवळ उभी करण्याच्या संकल्पनेचा पहिला टप्पा आहे. तालुक्यात एकूण २५ वनराई बंधारे उभारून पाणी अडविणे, पाणी जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि स्थानिक जलस्रोत अधिक सक्षम करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
खेड शहरावर दुष्काळाचे सावट येऊ नये आणि भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी आतापासूनच ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाण्याचे महत्त्व लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनासाठी पुढाकार घेणे गरजेचे असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश केवळ घोषणेत न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे.
नारंगी नदीसह तालुक्यातील विविध स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा साठा वाढविणे आणि पावसाचे पाणी अधिकाधिक जमिनीत मुरविण्यासाठी वनराई बंधारे प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे या मोहिमेत नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवून जलसंवर्धनाच्या कामाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
दुष्काळमुक्त खेडच्या दिशेने सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करत ॲड. वैभव खेडेकर यांनी वाढदिवसानिमित्त घेतलेला हा संकल्प पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देणारा ठरला आहे. खेड तालुक्यातील २५ वनराई बंधारे उभारण्याची मोहीम पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने पहिल्या बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमावेळी खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष तथा भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश बामणे, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, भाजपा खेड शहर शक्तिकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, भाजपा युवा मोर्चा खेड तालुका उपाध्यक्ष अविराज मोरे, भाजपा खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, परशुराम दवंडे, रुपेश तरडे, नंदू शिर्के, रोहित भुवड, अक्षय सनगरे, जयेश गुहागरकर, भाजपा सोशल मीडिया खेड शहर प्रमुख सर्वेश पवार, प्रदीप भोसले यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.













