” त्रैलोक्याचा याचा हा धनी | यशोदेशी म्हणतो आई”— पारंपरिक सोहळ्यास तरुणाईचा उदंड प्रतिसाद ! ज्येष्ठ निश्चित?
बालगोपाळ मंडळाचे यशस्वी नियोजन !
फोंडाघाट : कुमार नाडकर्णी— श्री देव राधाकृष्ण मंदिरात नैवेद्याची आरती संपन्न झाली. आणि महाप्रसादानंतर, अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या महिन्याच्या कालावधीत, संपन्न झालेल्या काकड आरतीची समाप्ती उदंड उत्साहात पार पडली. गेले महिनाभर हिंदू धर्मातील भागवत परंपरेप्रमाणे स्थापनेपासून पेठेतील या मंदिरात, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, पहाटे ठीक साडेपाच वाजता काकड आरती संपन्न होत आहे .मात्र गेल्या काही वर्षात,या परंपरेची ओढ युवाई मध्ये अधिक वेगाने रुजत असल्याने,या सोहळ्याला तरुणांची उपस्थिती सर्वांचेच आकर्षण ठरत आहे. चालू वर्षी तर शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनी, तरुणाई, झेनझीची उपस्थिती ज्येष्ठांना दिलासा देणारी ठरली. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षाची परंपरा यापुढेही आणि द्विगुणित उत्साहात अखंडित राहील असा सार्थ विश्वास व्यक्त केला जात आहे ….
तुका म्हणे माझे | हेची सर्व सुख |पाहीन श्रीमुख आवडीने | अशा भजनपदांनी काकड आरतीची, टाळ मृदंगाच्या गजरात सुरुवात होते. आणि पहाटेचे वातावरण अधिक आल्हाददायक बनते.उदो झाला पाहिली वेळ | उठावाचे वदा गोपाळ | कैसा वासुदेव बोलतो बोल | या भजनानंतर वासुदेवाच्या महितीचे अभंग– तुका म्हणे रे धन्य त्याचे जिणे |जीही घातले वासुदेवा दान | या पदांनी परमेश्वराला हळूहळू जागे करतात. त्यानंतर आंधळे- पांगळे यांचे अभंग देवाला विनवतात. आणि- असो नसो भाव ,आलो तुझीया ठाया | कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया | या आळवणीने कन्हैयाला भुपाळ्या म्हणून जागे केले जाते. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा | झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा | अभंगातून भक्त मंडळी देवाला जाणीव करून देतात. बाहेर झुंजूमुंजू होऊन सह्याद्रीच्या डोंगरातून सूर्याची किरणे पेठेवर पहुडतात.
तोपर्यंत लवकर आलेले राजा कोथंबीरे यांनी मंदिर व पायऱ्या पाण्याने स्वच्छ केलेले असतात .तर विद्या म्हसकर मॅडमनी गाभाऱ्यात पाण्याची सोय करत महाद्वारावर शुभ रांगोळी ने वातावरण प्रसन्न केलेले असते.गाभाऱ्यात रामा पारकर आणि सदा पारकर यांनी देवाची षोडशोपचारी पूजा करून, त्यांना वस्त्रालंकार, विविध फुले आणि दागिन्यांनी सालंकृत केले जाते. काकडा (ज्योत) पेटवून भिडते बंधु देवाला ओवाळतात आणि भक्तांकडून — भक्तीचिया पोटी, बोध आकडा ज्योती | पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती | ने काकड आरती सुरू होते. देव भक्तांच्या हट्टाने जागा होतो. आणि सुरू होते- गौळण ! पैलतीरी हरी वाजवी मुरली | कशी जाऊ मी वृंदावना ? ऐक ऐक सखये बाई | नवल मी सांगू काई | त्रैलोक्याचा हा धनी | यशोदेशी म्हणतो आई | या खेळीयाच्या नटखट लिला अभंगातून म्हटल्यावर, विनंतीचे अभंग,भजनाचे रूपक आणि देव- देवतांच्या आरत्यांची चढाओढ सुरू होते. त्यानंतर पसायदान मागितल्यावर सर्वांना निरामय आरोग्य, सुख- समृद्धीचे श्लोक अत्यंत मनोभावे होतात.
गेला महिनाभर चाललेल्या या काकड आरती पंचक्रोशीतील युवाई, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पेठेला पारंपारिक आयाम मिळवुन देतात. त्यामुळे भर पेठेतील श्री देव राधाकृष्ण गणपती मंदिर पहाटे गजबजुन जाते. प्रसन्न वातावरण निर्माण होते. याचा आनंद सर्वत्र व्यक्त होत आहे….













