आम. दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन.
वेंगुर्ले : प्रतिनिधी
जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग व पंचायत समिती, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ वे वेंगुर्ला तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन सन २०२६-२७ चे आयोजन परुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर येथे करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २७ व शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी असे दोन दिवस हे प्रदर्शन होणार आहे. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता प्राथमिक व माध्यमिक गटातील निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच प्रतिकृती मांडणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. दुपारी २ वाजता प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.
त्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी १० वाजता प्रतिकृतींचे परीक्षण, सकाळी १०.३० वाजता प्राथमिक गटाची प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३ वाजता मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ व प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.
या बालवैज्ञानिक प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळणार असून, त्यांच्या कल्पकता, संशोधनवृत्ती व नवोपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनाला तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वसुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे, वेंगुर्ला तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संजय तुळसकर तसेच अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेचे मुख्याध्यापक सचिन माने यांनी केले आहे.












