देवसू येथे आगीच्या भडक्यात महिला गंभीर

सावंतवाडी : देवसू गावात आज सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घरात आग लागून एक महिला गंभीर जखमी झाली. सुवर्णा संतोष डोईफोडे (वय ४४) असे या महिलेचे नाव असून, त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा डोईफोडे या त्यांच्या न्हाणीघरात चूल पेटवण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी चुलीत डिझेल ओतले आणि त्यानंतर आग लावण्यासाठी काडीपेटीचा वापर केला. मात्र, यामुळे आगीचा मोठा भडका उडाला. या आगीत त्यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला आणि त्या गंभीररित्या भाजल्या.

घटनेनंतर त्यांना तात्काळ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना रात्री उशिरा गोवा बांबोळी येथील रुग्णालयात हलवण्यात आले.