रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रथमच रत्नागिरी तालुक्याला मान मिळाला आहे. 2009 पासून तालुकाध्यक्ष असणारे रामचंद्र केळकर यांची निवड जिल्हाध्यक्ष म्हणून बिनविरोध करण्यात आली. कार्यवाहपदी अमोल लिंगायत यांची निवड करण्यात आली.
माध्यमिक पतपेढीच्या सभागृहात नुकतीच संघटनेची वार्षिक सभा झाली. यामध्ये जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, कार्यवाह शिवाजीराव खांडेकर, सातारा जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कार्यवाह इमरान मुल्ला या वेळी उपस्थित होते.
मावळते जिल्हाध्यक्ष गजानन पाटणकर, कार्यवाह प्रकाश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सभा सुरू झाली. मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आर्थिक बाबींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांच्यासमोर रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या. सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर खांडेकर यांनी सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन शिक्षकेतरांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याची जाणीव असल्याचे सांगितले. ते सोडवण्यासाठी आजपर्यंत कोणकोणते प्रयत्न करण्यात आले, याबाबतही मार्गदर्शन केले. लवकरात लवकर कसे प्रश्न सोडवले जातील याबाबत मार्गदर्शन केले. केळ्ये येथील श्री शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरचे लिपिक असणारे श्री. केळकर हे अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवत आहेत.
नूतन कार्यकारिणी
कार्याध्यक्ष- मंगेश सावंत (मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली), उपाध्यक्ष – उमेश दळवी (माध्यमिक विद्यालय, कारवली), उपाध्यक्ष- उमेश पालांडे (यशवंत विद्यालय, धामणंद, खेड), उपाध्यक्ष- चंद्रशेखर लिंगायत (कोळवली हायस्कूल, गुहागर), कार्यवाह- अमोल लिंगायत (पै. एच. डी. मुल्ला माध्यमिक विद्यालय, कुरधुंडा, संगमेश्वर), राजेश झगडे (वेळवी पंचक्रोशी विद्यालय, दापोली), कोषाध्यक्ष- संतोष शिंदे (रा. पु. पटवर्धन विद्यालय, कुर्धे, रत्नागिरी), आयव्यय निरीक्षक- मनोज लाखण (आदिष्टी विद्यामंदिर, गोवळ, लांजा), सल्लागार- रमेश सुर्वे (माध्यमिक विद्यालय, कोळवली), राजेंद्र शिंदे (बोरज हायस्कूल, खेड), गजानन पाटणकर (पेढे हायस्कूल, चिपळूण), प्रकाश साळवी (राजापूर हायस्कूल), कैलास धाडवे (न्यू इंग्लिश स्कूल, तुळशी, मंडणगड), महिला प्रतिनिधी- माधुरी सावंत (युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण), सौ. प्रियांका धर्णे (शिर्के प्रशाला, रत्नागिरी), महामंडळ प्रतिनिधी- संजय पाटील (पैसाफंड हायस्कूल, संगमेश्वर).












