
चिपळूण : एक जुलै हा दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिन व जीएसटी दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय रूपया चलनात येण्यापूर्वी व्यवहार पद्धतींची माहिती देणारे अकौंटन्सी म्युझियम सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे डी.बी.जे. कॉलेजमध्ये सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, शाखेचे माजी अध्यक्ष सीए मुकुंद मराठे यांच्या हस्ते व डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी सीए अभिलाषा मुळ्ये यांनी अकौंटन्सी म्युझियमचा उपयोग विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त बहुमूल्य माहिती मिळविण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सीए मुकुंद मराठे यांनी मनोगत व्यक्त करताना, अकौंटन्सी म्युझियमचे उद्घाटन चार्टर्ड अकाऊंटंट दिवस म्हणून साजरा होणाऱ्या 1 जुलै या दिवशी सीए रत्नागिरी शाखेच्या सर्व पदाधिकारी आणि चिपळूणमधील चार्टर्ड अकाऊंटंट या सर्वांच्या उपस्थितीत होणे हा दुग्धशर्करा योग आहे, असे नमूद केले.
डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी अकाउंटन्सी आणि गणित यांच्या परस्पर संबंधांचा दाखला दिला तसेच या अकौंटन्सी म्युझियममुळे विद्यार्थ्यांना पैशांचे मूल्य, व्यवहार पद्धतींची याची माहिती मिळेल याबद्दल समाधान व्यक्त केले. डी.बी.जे. महाविद्यालय हे चिपळूण व गुहागर क्लस्टरमधील लीड कॉलेज असल्यामुळे या भागातील वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा या म्युझियमचा लाभ घेता येईल, असे सांगितले. तसेच डी.बी.जे. महाविद्यालयातील नावीन्यपूर्ण उपक्रमांची आणि अभ्यासक्रमांची माहिती दिली.
सौ. रुपाली दांडेकर यांनी डी. बी. जे. महाविद्यालयातील सीए, सीएस व सी.एम. ए. या प्रशिक्षण केंद्राबद्दलची माहिती दिली. अकौंटन्सी विभाग प्रमुख प्रा. चेतन खांडेकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या कौशल्य आधारित शिक्षणाची माहिती दिली तसेच इंटर्नशिप / प्रशिक्षणासाठी आपल्या विद्यार्थ्यांना संधी द्यावी असे आवाहन सर्व चार्टर्ड अकाऊंटंटना केले.
चिपळूणमधील ज्येष्ठ सीए शशिकांत काळे यांनी महाविद्यालयामधील विविध उपक्रमांचे कौतुक करताना सर्व उपक्रमांसाठी शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या म्युझियमच्या उभारणीसाठी सीए अमित ओक, सीए सुमेध करमरकर आणि प्रा. चेतन खांडेकर यांनी पुढाकार घेतला. यासंदर्भात सीए अमित ओक यांनी डी. बी. जे. महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्यामुळे हे म्युझियम आपल्या महाविद्यालयात व्हावे, अशी इच्छा या निमित्ताने पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या उपक्रमासाठी नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट यांचे आभार मानले.
सूत्रसंचालन प्रा. शिल्पा भिडे यांनी केले. प्रा. चेतन खांडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सीए शाखेचे उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर, कोषाध्यक्ष आणि पश्चिम भारत सीए विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए अक्षय जोशी, माजी अध्यक्ष सीए मुकुंद मराठे, सदस्य सीए प्रसाद आचरेकर, सीए सुमेध करमरकर, सीए चिन्मय काळे, सीए जुली ओसवाल, सीए मयुरेश पटवर्धन, सीए सुनित खेराडे, सीए अनिकेत सोहनी, सीए स्वानंद हिर्लेकर, सीए अनामय बापट, सीए जाई चौधरी यांच्यासह उपप्राचार्य प्रा. तळप पर्यवेक्षिका प्रा. कुलकर्णी, रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, अकौंटन्सी वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते.












